तेलंगणात खून करून लुटीतील सोन्याची विक्रीचे धागेदोरे इंदापूर च्या व्यापाऱ्याकडे..! लुटीतील सोने जप्त करुन तेलंगणाच्या पोलीसांनी ‘त्या’ व्यापाऱ्याला दिले सोडून.! पोलीस व व्यापारी यांच्या अर्थपूर्ण वाटाघाटीचीच सर्वत्र चर्चा.!!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : तेलंगणा राज्यातील नलगोंडा येथील खून व दरोडा प्रकरणाचे धागेदोरे इंदापूरपर्यंत पोहोचले. लुटीतील सोन्याची विक्री इंदापूरच्या व्यापाराकडे केल्याच्या प्रकरणावरून दोन आरोपींना पकडून, तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात देण्याची महत्वपूर्ण भूमिका इंदापूर पोलीसांनी बजावली. तसेच चोरीचा मुद्देमाल असणारे दागिनेही मिळवून देण्याची कामगिरी ही इंदापूर पोलिसांनी केली.
मात्र चोरीचे सोने विकत घेणाऱ्या इंदापूरच्या त्या व्यापाऱ्यावर कोणताही गुन्हा दाखल केला नाही. गुन्ह्यात सहभाग असताना देखील त्या व्यापा-यावर कसला ही गुन्हा का दाखल झाला नाही? इंदापूरच्या ‘त्या’ सोन्याच्या व्यापाऱ्याचा स्पष्ट सहभाग असल्याचे आढळून आल्यानंतर, भादंवि कलम ३४ नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना देखील त्याच्यावर कसलाही गुन्हा दाखल न करता त्याला सोडून देण्यात आल्याने तेलंगणा पोलिसांबरोबर आर्थिक वाटाघाटी झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
या प्रकरणाविषयी माहिती अशी की, नलगोंडा येथे राजवर्धन नावाच्या इसमावर स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने खुनी हल्ला करुन त्याच्याकडील सोने लुटण्याचा प्रकार नुकताच घडला. तपास करताना आप्पाराव पवार व शुभम पवार हे दोन सराईत गुन्हेगार नलगोंडा पोलिसांच्या ताब्यात सापडले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन दरोडेखोरांच्या एका टोळीने धुमाकूळ घातल्याचे व त्या टोळीने एकंदर ३२ ठिकाणी दरोडे घातल्याचे तेथील पोलीसांच्या तपासात आढळून आले.
याचे धागेदोरे इंदापूरपर्यंत आल्याने तेलंगणा राज्यातील पोलीस पथक इंदापूरला आले. त्यांनी तपासकामात इंदापूर पोलिसांचे सहकार्य मागितले. त्यांनी सांगितलेल्या वर्णनावरुन इंदापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार प्रकाश माने यांनी या गुन्ह्यातील दोन आरोपींना पकडून देण्यासाठी तेलंगणा पोलिसांना मोलाची मदत केली.
या प्रकरणातील आरोपींनी दरोड्यातील सोने इंदापूर मधील दुकानात विकल्याचे व तेलंगणा पोलीसांनी त्या दुकानाच्या मालकाला ताब्यात घेत त्याच्याकडे कसून चौकशी केली. व्यापा-याने विकत घेतलेले दरोड्यातील चौदा तोळे सोने ही पोलीसांनी जप्त केले. दरोडेखोरांना पकडण्याची मोहीम फत्ते करणारे इंदापूरचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश माने यांचे तेलंगणा (नालगोंडा) येथील पोलीस अधीक्षक सरदचंद्र पवार यांनी आभार मानले व त्यांना सन्मानित केले.











