सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
जिल्हा नियोजन समितीच्या काल पुण्यात झालेल्या बैठकीत आमदार दत्तात्रय भरणे यांनी विविध मागण्या मांडल्या. यावेळी सध्या खडकवासला व निरा देवधर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. मात्र या दोन्ही प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या इंदापूर तालुक्यात पाऊस सध्या झालेला नाही. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील खडकवासला व निरा डावा कालव्याला पिण्यासाठी व शेती सिंचनासाठी व तलाव भरण्यासाठी पाणी सोडावे. तसेच उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना आठ तास वीज द्यावी. अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.
भरणे यांची मागणी विचारात घेऊन पालकमंत्री अजित पवार यांनी या दोन्ही कालव्यांना रविवार 21 जुलैपासून पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेती पंपांना आठ तास वीज देण्याच्या सूचना वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना आज दिल्या.
आमदार दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या या मागणीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतात उभ्या असलेल्या पिकांना व नव्याने लागण केलेल्या ऊस पिकांनाही याचा फायदा होणार आहे, तसेच या दोन्ही कालव्याच्या लाभ क्षेत्रात असणाऱ्या गावोगावच्या पाणीपुरवठा योजनांना भूमिगत जलस्त्रोत बळकट होऊन पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर खडकवासला व नीरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व तलाव भरले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा आगामी काळातील शेती सिंचनाचा प्रश्न देखील मिटवण्यासाठी मदत होणार आहे
तसेच याच बैठकीत श्री भरणे यांनी उजनी बॅक वॉटर मध्ये शेतकऱ्यांना सद्या 6 तास वीज पुरवठा दिली जाते. ती 8 तास करणेत यावी. अशी मागणी श्री पवार यांच्याकडे केली असता तात्काळ पालकमंत्री अजित पवार यांनी मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी यांना आठ तास करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे उजनी धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.











