बारामती : महान्यूज लाईव्ह
गेल्या दोन-तीन वर्षात लाचखोरीची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर उघडकीस येत असूनही सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची भूक काही भागत नाही. 50 हजारापासून एक लाख रुपये पगार असलेले अधिकारी, कर्मचारी सामान्य गरीब शेतकऱ्यांकडून चार-पाच हजाराची लाच मागायला ही लाजत नाहीत. बारामतीतून पोलीस खात्यानंतर आता सहकारी संस्थांच्या सहाय्यक निबंध कार्यालयातून एका अधिकाऱ्याला लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
अनिल कुमार संभाजी महानवर असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून त्याला शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आली. शेतकऱ्याच्या जमिनी संदर्भातील डाव्यामध्ये शेतकऱ्याने आणलेला स्थगिती आदेश फक्त जमा करून घ्यायचा होता. मात्र त्यासाठी देखील या महारनवरने पाच हजार रुपयांची लाच मागितली. त्यावरून वैतागलेल्या शेतकऱ्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मदत घेतली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने याची पडताळणी केली, तेव्हा महारनवर याने पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. एसीबीच्या पथकाने या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी तक्रारदारास सहाय्यक निबंधक कार्यालयात पाठवले.
महानवर याच्याशी तडजोडीअंती पाच हजार रुपयाची साडेचार हजार रुपयांवर लाच ठरली. ती देत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि साडेचार हजार रुपयांची लाच घेताना अनिल कुमार महारनवर याला रंगेहाथ पकडले. बारामतीच्या प्रशासकीय भवनात ही कारवाई झाल्याने संपूर्ण बारामतीत खळबळ उडाली आहे.











