भिगवण : महान्यूज लाईव्ह
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसाची तयारी सुरू असतानाच अजित पवारांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून उजनीतील मच्छीमारांना सलग दुसऱ्या वर्षी गुड न्यूज दिली आहे. आमदार दत्तात्रय भरणे यांचा पाठपुरावा आणि सलग दुसऱ्या वर्षी एक कोटी मत्स्यबीज सोडण्याच्या निर्णयामुळे उजनीतील मच्छीमारांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षी सोडण्यात आलेल्या मत्स्यबीजामुळे उजनी मधून हद्दपार होत असलेल्या रोहू, कटला सारखे देशी मासे पुन्हा दिसू लागले आहेत आणि मच्छीमारांनाही दिवस चांगले येऊ लागले आहेत.
यंदा उजनीत सलग दुसऱ्या वर्षी एक कोटी मत्स्यबीज सोडण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती आज आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली. हा निर्णय म्हणजे मच्छीमारांनी जणू ऐन पावसाळ्यात दिवाळीच्या सणासारखाच होता.
उजनी मध्ये काही वर्षांपर्यंत ज्या देशी जातींचे मासे मोठ्या प्रमाणात मुबलक मिळायचे ते आता अजिबात मिळत नाहीत त्याऐवजी उजनी हे प्रदूषित माशाचे मानक समजले जाणाऱ्या चिलापीचे आगार बनले आहे उजनी मध्ये तब्बल 40 हून अधिक देशी उत्तम असलेल्या माशाच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या त्यामुळे उजनीत गेली अनेक वर्ष मच्छीमारांसाठी प्रामाणिकपणे काम करणारे पत्रकार भरत मल्लाव तसेच माजी सरपंच उज्वला परदेशी, संजय दरदरे, चंद्रकांत भोई, अनिल नगरे, राहुल भोई, पत्रकार प्रविण नगरे, आदींनी आमदार दत्तात्रय भरणे याना भेटून उजनीची व्यथा मांडली होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार दत्तात्रय भरणे यांनी आश्वासन दिले होते. आणि काही दिवसांनी निर्णय झाला होता.
त्यामुळे तब्बल 28 वर्षानंतर मागील वर्षी उजनी मध्ये एक कोटी मत्स्यबीज सोडण्यात आले होते. अवघ्या काही महिन्यातच या सोडलेल्या मत्स्यबिजातील रोहू आणि कटला मासे एक किलो, दोन किलो ते अगदी तीन किलोपर्यंत इतक्या आकारापर्यंत वाढले. त्याचा मच्छीमारांना खूप फायदा झाला. त्याचवेळी अजितदादा आणि भरणे मामांनी पुढच्या वर्षी देखील आम्ही एक कोटी मत्स्यबीज सोडणार आहोत असे स्पष्ट केले होते.
गतवर्षी जिल्हा नियोजन मंडळाच्या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातून एक कोटी तर सोलापूर जिल्हा नियोजन मंडळांनी तीस लाख असे एक कोटी तीस लाख मत्स्यबीज सोडले होते. आता यावर्षी देखील पुणे व सोलापूर या दोन्ही जिल्ह्यातून असेच मछली सोडले तर मच्छीमारांची मत्स्य बीज आणि माशांची टंचाई संपण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर उजनी पुन्हा एकदा देशी माशांचे आगार बनू शकते.
दरम्यान या निर्णयामुळे मच्छीमारांनी आनंद व्यक्त केला असून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार दत्तात्रय भरणे ज्याप्रमाणे बोलले त्याप्रमाणे सलग दुसऱ्या वर्षी मत्स्यबीज सोडले गेल्यामुळे उजनी सारखे राज्यातील सर्वात मोठे धरण पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त होईल असाही आशावाद उजनीतील भोई व मच्छिमार बांधवांनी व्यक्त केला. राहुल नगरे, ऍड.विशाल मल्लाव, बलभीम भोई, धनाजी पतुले, सतीश खानेवले, भगवान भोई आदींनी या निर्णयाचे स्वागत केले.











