राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : महाराष्ट्र शासनाने नुकतीच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दौंड तालुक्यात तब्बल १० हजार ६२५ लाभार्थी महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले आहेत. ही माहिती दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत काळे आणि प्रकल्प अधिकारी अभिमान धुमाळ यांनी दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महिलांना मुख्यमंत्री लाडके बहिण योजने अंतर्गत १५०० रुपये देण्याची घोषणा केली. हे अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलांनी आवश्यक कागदपत्र काय असावीत या संदर्भात नवीन नियम व अटी लागू केल्या. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांची आवश्यक कागदपत्र जुळवाजवळ करण्यासाठी धांदल उडत आहे.
दौंड तालुक्यात मुख्यमंत्री लाडक्या बहिणी योजनेच्या संदर्भातील माहिती सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी दौंड पंचायत समिती प्रशासनाने पूर्ण तयारी केली होती. ही योजना लागू झाल्यापासून १५ जुलैपर्यंत दौंड तालुक्यात तब्बल १० हजार ६२५ लाभार्थी महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये ऑफलाईन ६ हजार ९६० आणि ऑनलाईन ३ हजार ६६५ महिलांनी अर्ज भरले आहेत.
ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना सविस्तर माहिती देत असून जास्तीत जास्त महिलांनी ऑफलाइन आणि ऑनलाईन अर्ज भरून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत काळे आणि प्रकल्प अधिकारी अभिमान माने यांनी केले आहे.











