बारामती पोलिसांनी १८ तासांत सांगलीतून १४ वर्षाच्या मुलाची केली सुटका
बारामती – महान्यूज लाईव्ह
अलिकडे गुन्हेही असे चमत्कारीक घडतात की, विचारताच सोय नाही. बारामती तालुक्यातील पिंपळी येथेही असाच गुन्हा घडला की, तो चक्रावून टाकणाराच ठरला. बायकोला शेजारच्या इसमाने फूस लावून पळवून नेले, यावरून मूळच्या सांगलीचा रहिवासी असलेल्या पतीने, ज्याच्यावर संशय होता, त्याच्या भावाला अपहरण करून पळवून नेले व तिकडेच डांबून ठेवले. बारामती शहर पोलिसांनी हा तिढा सोडवताना अगोदर पळवून नेलेल्या १४ वर्षीय युवकाची सुटका केली.
घटना ६ जुलै रोजीची.. बारामती शहर पोलिस संत तुकाराम महाराज पालखी बंदोबस्ताची तयारी करण्यात मग्न असतानाच पिंपळी येथील बाबासाहेब लक्ष्मण पवार यांनी शहर पोलिसांना तक्रार दिली की, पिंपळी येथील राहणाऱ्या, परंतू मुळच्या मोराळे, (ता. तासगाव जि. सांगली) येथील जाधव याने आपला मुलगा विनायक याचे अपहरण केले असून त्याला तो घेऊन गेल्याचे सांगितले.
पोलिस अधिक सखोल चौकशीत गेल्यानंतर पोलिसांच्या लक्षात सारा प्रकार आला. बाबासाहेब पवार यांच्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा रोहित हा संशयित आरोपी जाधव याच्या पत्नीस फूस लावून पळवून घेऊन गेल्याचा संशय जाधव याला आला. त्यावरून जाधव यानेही काट्याने काटा काढायचा म्हणून संशयित रोहित याचा १४ वर्षीय भाऊ विनायक यालाच अमिष दाखवून पळवून नेले.
माझी पत्नी आणून सोडा, नाहीतर विनायकला तुमच्या ताब्यात देणार नाही अशी धमकी जाधव हा देत असल्याची माहिती पवार यांनी दिली, त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला व तपासाला सुरवात केली. शहर पोलिसांनी दोन पोलीस पथके तयार करून सोलापूर व सांगली जिल्ह्यात रवाना केली.
दरम्यान जाधव हा बाबासाहेब पवार यांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून हुलकावणी देत होता. मग पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे माग काढला व सांगली जिल्ह्यातील खानापूर येथून आरोपीस ताब्यात घेऊन विनायक याची सुटका केली.
ही कारवाई पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर व शहर पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन चेके, कुलदीप संकपाळ, फौजदार युवराज घोडके, पोलीस हवालदार यशवंत पवार, मोहमद अंजर मोमीन, अंकुश दळवी आदींनी ही कामगिरी पार पाडली.











