दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : वाई शहरात आवाजामुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी वाईच्या वाहतूक पोलिसांनी एक मोहीम राबवत जोरात आवाज काढणाऱ्या तसेच विनापरवाना फिरणाऱ्या किंवा इतर तांत्रिक बाबी मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेला अडचण ठरणाऱ्या बुलेट चालकांवर कारवाई केली आहे.
बुलेट म्हणजे प्रतिष्ठेची असे समजून अनेक जण बेदरकारपणे रस्त्यावरून बुलेट चालवत असतात. त्याही पलीकडे जाऊन काही तरुण मुलं बुलेटच्या सायलेन्सर ची पुंगळी काढून मोठ्या आवाजात बुलेटचा आवाज करत रस्त्यावरून ये-जा करत असतात. त्याचा सामान्य नागरिकांना मोठा त्रास होतो, तसेच वाहतुकीवरही मोठा परिणाम होतो. यासंदर्भात वाईच्या स्थानिक नागरिकांनी पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना तक्रारी केल्या होत्या.
जितेंद्र शहाणे यांनी वाहतूक पोलिसांच्या पथकाची बैठक घेऊन या संदर्भात कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार वाईच्या पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस अंमलदार रामदास कोळेकर, गोरख दाभाडे, रुपेश जाधव, स्नेहल सोनवणे यांनी यासंदर्भात काल दिवसभर मोहीम राबवली आणि अशा बुलेट चालकांविरोधात दंडाची व जप्तीची कारवाई केली.











