सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात अतिउत्साही कार्यकर्ते हे नेत्यांना आता अगदी तोंडावर आपटणार की काय असे दिसतंय.. नेते काही बोलत नाहीत, पण कार्यकर्त्यांना निवडणुकीची एवढी काय उत्सुकता लागलेली आहे की, कार्यकर्त्यांनी, नेत्यांना विचारात न घेताच फ्लेक्स फलक उभा करायला सुरुवात केली आहे. इंदापूर तालुक्यातील फ्लेक्स फलकाचे हे युद्ध सध्या इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी चर्चेचा विषय ठरू लागले आहे. अर्थअर्थात इंदापुरात उभं राहिलेलं फलक हे नेत्यांच्या इच्छेखातर उभे केलेत की फक्त बातम्यांसाठी? याचा मात्र अद्याप उलगडा झाला नाही.
चार दिवसांपूर्वी चार दिवसापूर्वी इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी हर्षवर्धन पाटलांचा फोटो किंवा नाव न वापरता फ्लेक्स फलक उभा केला, मात्र यामध्ये त्यांनी हर्षवर्धन पाटलांनी पूर्वी अपक्ष म्हणून लढवलेल्या विमान या चिन्हाचा त्यांनी वापर केला. त्यामुळे हे फलक हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनीच लावले आहेत अशा स्वरूपाची चर्चा सुरू झाली.
दरम्यान महायुतीमध्ये अजित पवार असणारच असे संकेत मिळत असल्याने आता हर्षवर्धन पाटलांना अपक्ष किंवा बंडखोरी करण्याचा पर्याय नाही, असा सूर त्यांच्या कार्यकर्त्यांमधूनच उमटू लागला आहे. त्याचाच हा परिणाम असल्याचे सांगितले जात होते. याला एक दिवस संपला नाही, तोच लगेच दत्तात्रय भरणे यांचे कार्यकर्ते इरेला पेटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तातडीने आमचं ठरत नसते आमचं फिक्सच असते अशा स्वरूपाचा दत्तात्रय भरणे यांच्या फोटो सहित एक फ्लेक्स फलक लावला आणि महायुतीमध्ये काहीच अलबेल नाही याचा देखील संदेश दिला.
मग इंदापूर तालुक्यात आघाडी घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते कसे थांबतील? त्यांनी देखील पवार साहेब सांगतील तोच आमदार असेल अशा स्वरूपाचा एक फ्लेक्स फलक लावून आपणही स्पर्धेत आहोत असे दाखवून दिले. त्यांचे कुठे मिटत नाही, तोच राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा फोटो वापरत नगरसेवक समर्थकांनी एक नवा फ्लेक्स फलक उभा केला. त्यामध्ये आमदार साहेब अशी उपमा गारटकरांना देऊन टाकली. थोडक्यात गारटकरांनाही त्यांनी आमदारकीच्या शर्यतीत आणून ठेवले आहे. अर्थात या नगरसेवकांनी त्यांची नावे त्यात नमूद केलेली नाहीत.
आता मूळ प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे एक तर महायुतीमधून एकच उमेदवार आमदारकीची लढत लढणार! अशावेळी इतरांना बंडखोरी करावी लागेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट इथे एवढी मोठी स्पर्धा आहे की जनभावनेच्या नकारात्मक लाटेवरती लोकसभेची निवडणूक झाली, त्यामुळे लोकसभेमध्ये जे घडले, ते विधानसभेमध्ये घडलंच असं नाही. हे माहीत असतानाही आता कार्यकर्त्यांकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे. सामान्य नागरिक आणि प्रवाशांचे मात्र याकडे चांगलेच लक्ष असून सगळेजण याची मजा घेत आहेत. तुमचं चालू द्या, आमचं पण फिक्स आहे.. असंच जणू ते लोक म्हणत नसतील ना?











