मुंबई : महान्यूज लाईव्ह
जर सातारा मतदारसंघात तुतारीच्या विरोधात अपक्ष पिपाणी नसती, तर वेगळा निकाल दिसला असता. हे सगळेच सांगत आहेत, त्यामुळेच लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवारांना पिपाणीने त्रास दिला असला, तरी आता विधानसभेत हे पिपाणी नको असा इशारा खुद्द शरद पवार यांनीच दिला आहे. जर निवडणूक आयोगाने मुद्दाम हे चिन्ह चिन्हांमध्ये ठेवले, तर आपण न्यायालयाचे दरवाजे ठोठावू इशारा शरद पवार यांनी दिला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिले होते मात्र ऐन निवडणुकीच्या काळात अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह निवडणूक आयोगाने बहाल केले होते. याचा परिणाम बारामती सह सर्वच मतदारसंघात दिसला अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे आठ उमेदवार तरी देखील निवडून आले मात्र बीड सातारा व दिंडोरी या मतदारसघात पिपाणीने
नाकात दम आणला त्यातील बीड आणि दिंडोरी शरद पवारांनी जिंकली मात्र साताऱ्यात शशिकांत शिंदे यांना पराभव पत्करावा लागला.
विशेष म्हणजे दिंडोरी मध्ये पिपाणी चिन्ह घेतलेल्या बाबू भरगे यांना एक लाख तीन हजार मते पडली. या मतदारसंघात भास्कर भगरे यांचा विजय एक लाख 13 हजार मतांनी झाला. दुसरीकडे सातारा मतदारसंघात मात्र पिपाणीने घात केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा 30000 मतांच्या फरकाने पराभव झाला अर्थात या मतदारसंघातील निवडणुकीत पिपाणीच्या अपक्ष उमेदवाराला तब्बल 37 हजार मते मिळाली.
बीडमध्ये देखील पिपाणी चिन्ह घेतलेल्या उमेदवाराला तब्बल 55 हजार मते मिळाली. शिरूर बारामती मतदारसंघातही पिपाणीच्या उमेदवाराला लक्षणीय मते मिळाली. या सगळ्याचा विचार करता विधानसभेला खूप कमी फरकाने निकाल लागतो, अशा परिस्थितीमध्ये संभ्रम निर्माण करणारी चिन्हे नकोत, याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आत्ताच निवडणूक आयोगाला सुचित केले आहे. निवडणूक आयोगाने अशा प्रकारची संभ्रम निर्माण करणारी चिन्हे देऊ नयेत, अन्यथा निवडणूक आयोगाच्या विरोधात आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतील असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.











