दौंड, महान्यूज लाईव्ह
तालुक्यातील दापोडी गावातील एकाच कुटुंबातील तीन जणांचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भालेकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
तालुक्यातील दापोडी येथे १७ जून रोजी घरातील तारेला विद्युत प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का बसून सुरेंद्र भालेकर, आदिका भालेकर आणि प्रसाद भालेकर या तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेनंतर गुरुवारी (दि.२०) खासदार सुप्रिया सुळे यांनी दापोडी येथे जाऊन भालेकर कुटुंबाची भेट घेतली.
यावेळी या कुटुंबातील मुलगी वैष्णवी हिचे सांत्वन करत घटनेची माहिती घेतली. नुकतीच इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या वैष्णवीच्या पुढील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेणार असल्याचे खासदार सुळे यांनी जाहीर केले, तसेच शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. महावितरण वीज कंपनीच्या गलथन कारभारामुळेच ही गंभीर घटना घडली आहे. यास राज्य सरकार जबाबदार असल्याची टिका सुळे यांनी यावेळी केली.











