काहीच काम नाही असे म्हणणारे कितीतरी युवक आजही हॉटेल, चौकाचौकात दिसतात..मात्र काहीच काम नाही म्हणून गप्प न बसता पंचाहत्तरीतील एक युवक जगातली आश्चर्ये बनवण्याचे काम करतोय…होय, दोन वेळची अॅंजिओप्लास्टी आणि अगदी पेसमेकर बसवलेला असूनही सोलापूरच्या शिशीर गांधींचा दिवस आजही कुठल्यातरी वास्तू निर्मितीत सुरू होतो आणि गुंतून जातो..!
शिशीर गांधी यांचे सोलापूरात वृंदावन लॉज आहे. लॉजमधील वातानुकुलीत २० ही खोल्या सतत बुक असतात..याच खोलीच्या बाजूला दोन खोल्या खास आहेत आणि रिसेप्शनचा हॉलही शिशीर गांधींच्या उपस्थितीने सतत बिझी असतो…रिसेप्शनच्या हॉलमध्ये खोलीचे बुकींग होत असते, तेव्हा दुसरीकडे निवांतपणे शिशीर गांधी हे नवीन कोणतीतरी वास्तू बनविण्याच्या प्रयत्नात असतात.. सध्या ते वीस मजली इमारत बांधण्यात मग्न आहेत. त्यातील तळमजल्यावरचे पार्किंग पूर्ण झाले होते आणि बाकी स्ट्रक्चर्स व प्लॅन तयार सुरू होता. त्यांच्याशी गप्पा मारल्या.
शिशीर गांधी आर्किटेक्चर नाहीत, मात्र कसलेल्या आर्कीटेक्चरपेक्षा कमी नाहीत..त्यांनी आजवर आयफेल टॉवर, ताजमहाल, संसद भवन, लंडनचा पूल, झुलता पिसाचा मनोरा, व्हाईट हाऊस, मास्कोची इमारत त्यापासून ते जगभरातील, देशातील विविध वास्तू त्यांनी बनवल्या आहेत. त्यांनी नाजूक नजाकतीने बनवलेल्या शेकडो वास्तू त्यातील सर्व बदल टिपत बनवल्या असल्याने त्या जैसे थेच वाटतात.. अर्थात आयुष्याच्या प्रतिकूल स्थितीला अनुकूल बनवत त्यांचा हा प्रवास सुरू आहे. सोलापूरकरांना ते चांगले परिचित असतीलच, मात्र आयुष्य हा एक जुगार आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत तो आनंदाने जगता आला पाहिजे, त्यामध्ये वेगवेगळे रंग भरता आले पाहिजेत, आता काहीच काम उरले नाही म्हणून उगीचच निवांतपणे पाण्यात खडे मारत बसण्यापेक्षा काहीतरी नवनिर्मिती करून दुसऱ्यांना आनंद देण्यातच खरे शहाणपण आहे हे शिशीर गांधी या वयात दाखवून आणि जाणवून देत आहेत…










