बारामती : राज्यच नव्हे तर देशात विकासाचे मॉ़डेल म्हणून ओळख असलेल्या बारामतीतील सध्या विचित्र प्रकार म्हणजे अंतर्गत रस्त्यांसह मुख्य रस्त्यांवर असलेले शेकडो गतीरोधक! पूर्णतः बेकायदेशीर असे शेकडो गतीरोधक शहरात असून प्रवाशांसह नागरिकही या गतीरोधकांना वैतागले आहेत. अगदी काही फूटांवर असलेल्या गतीरोधकांमुळे शहरातील रस्त्यांना विचित्र स्थिती आली आहे.
बारामती शहरातील एकही रस्ता असा नाही, जिथे काही फूटांवर गतीरोधक नाहीत, शहरात इंदापूरकडून प्रवेश करा किंवा भिगवण, मोरगाव, निरा, फलटणच्या बाजूने प्रवेश करा, असा कोणताच रस्ता नाही, जिथे जागोजागी गतीरोधक नाहीत. शेकडो गतीरोधकांना पार करूनच प्रवाशांना शहरात प्रवेश मिळतो. त्यातही मोरगाव रस्त्याकडून प्रवेश करताना पतंगशहानगर परिसरात तर रस्ता डांबरी करताना ठेकेदाराने चारचाकी वाहनांचे चेंबर फुटावेत अशा प्रकारे आपले गतीरोधकांचे कौशल्य दाखवले आहे. नगपरीषदेतील अधिकाऱ्यांच्या मते नागरिकांनी दबावाचे अस्त्र वापरून ठेकेदारांकडून असे गतीरोधक करून घेतले आहेत, ज्याचा आता इतरांना अधिक त्रास होत आहे, येत्या काही दिवसांत नगरपरीषदेमार्फत या गतीरोधकांची उंची कमी करून एकतर त्यांना सामान्य केले जाईल, अथवा हे गतीरोधक काढून टाकले जातील असे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात गेल्या काही महिन्यांत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. १००- १०० फूटांवर असलेले हे गतीरोधक शहराच्या सौंदर्याचे विद्रूपीकरण करीत आहेत, त्याचे मात्र स्थानिक रहिवाशांना काहीच सोयरसुतक नाही असेच चित्र आहे. संपूर्ण राज्यात कामकाजाच्या बाबतीत सुपरफास्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याच बारामतीत दिसणारे हे अडथळ्यांच्या शर्यतीचे चित्र बाहेरच्या जिल्ह्यांतून, तालुक्यांतून येणाऱ्यांना विचार करायला भाग पाडत आहे.











