बारामती – अवघ्या एका महिन्यात वाळूमाफियांचा ४.७३ कोटींचा ऐवज पुणे पोलिसांच्या बारामती क्राईम ब्रॅंच व दौंड, यवत पोलिसांच्या संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आला. मात्र कोटींची उड्डाणे करणारे वाळूमाफिया अशा कारवाईंनंतरही कायद्याला जुमानत नसल्याचेच दिसत आहे. आज (ता.८) बारामतीच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सर्वात मोठी कारवाई करताना वाळूच्या ३१ बोटी, ६ ट्रकसह वाळू, ३ जेसीबी मशीन्स असा २.४३ कोटींचा ऐवज जप्त केला. शिरापूर येथे भीमा नदीच्या पात्रात ही कारवाई करण्यात आली. पोलिस अधिकारी, शीघ्र कृती दलाच्या २० जवानांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक जयंत मीना या्ंच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच चे प्रमुख चंद्रशेखर यादव, सहाय्यक निरीक्षक संतोष लंगुटे, दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहायक निरीक्षक अजय अधिकारी, अझीझ शेख, सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, तसेच शीघ्र कृती दलाच्या पथकाने या कारवाईत भाग घेतला.
एका महिन्यात दौंड तालुक्यात करण्यात आलेली कारवाई
. १२ जानेवारी २०२० -खानोटा येथे 58 लाखांचा माल जप्त, 14 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल .
. २० जानेवारी २०२० – दौंड व यवत येथे वाळूच्या ७ ट्रकसह ७६.३५ लाखांचा ऐवज जप्त.
. ३१ जानेवारी २०२० – कानगाव येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करून 93 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज जप्त व १२ जणांवर गुन्हा दाखल.











