बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती लोकसभेची निवडणूक जिंकली बारामती सह राज्यभरातील आठ जागा जिंकल्या आणि आता शरद पवार विधानसभेच्या तयारीला लागले आहेत आजच त्यांनी बारामती तालुक्याची गावे न गावे पिंजून काढायला सुरुवात केली आहे. काहीही झालं तरी यंदा विधानसभेला महाराष्ट्र हातात घ्यायचाच अशा स्वरूपात उपस्थित लोकांना विजयाची स्वप्न दाखवत शरद पवारांनी विधानसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
यावेळी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा दाखला देत शरद पवारांनी स्वतःच्या राजकीय प्रवासाची कारकीर्द देखील लोकांपुढे मांडली. शरद पवारांनी सांगितले की, तुम्ही लोकांनी बळ दिले. तुम्ही लोकांनी सातत्याने निवडणुकांमध्ये भरभरून मते दिल्याने कधी कधी आठवतही नाही की, आपण किती वेळा निवडणुका लढवल्या? एक माढ्याची लोकसभा वगळता 13 निवडणुका बारामतीकरांच्या जीवावर लढवल्या गेल्या.
या सगळ्यांमध्ये यश मिळाले कधी लोकसभा कधी विधानसभा, कधी विधान परिषद तर कधी राज्यसभा, सगळ्या निवडणुकांमध्ये यश मिळत गेले. गेली 56 वर्ष तुमच्यामुळे राज्याच्या व देशाच्या राजकारणात मी असून अखंडितपणे सर्व निवडणुका जिंकल्या आहेत असा एक माईचा पुत मला दाखवा असे आव्हान देत शरद पवारांनी सांगितले की, उद्याच्या निवडणुकीत महाराष्ट्राची सत्ता हातात घ्यायची म्हणजे घ्यायची. या विधानसभेत आपल्या विचारांची सरकार आले तर तर ऊसाला आणि दुधाला कसा भाव मिळत नाही ते पाहण्याची जबाबदारी माझी.
शरद पवारांनी आपल्या अखंड विजयाचं गमक सांगतानाच अप्रत्यक्षरीत्या राज्यातील विरोधकांना देखील टोला दिला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी कसे होणार टिकाव लागणार का? असा प्रश्न जिथे उपस्थित केला जात होता, त्याच महाशक्तीपुढे आता अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. त्याचा विचार करता लोकसभेला तुम्ही जसं काम केलं.. तसंच काम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत करा. कोणी सांगेल, कोणी रागवेल, कोणी दम देईल. ते येतील, जातील, फिरून जातील. या वेळेला जसं कोणी काही म्हटलं तरी तुम्ही पाहिजे तेच बटन दाबलं.. तसंच नेमकं बटन उद्याच्या निवडणुकीतही दाबा.. असं पवारांनी सांगितलं.











