विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
माळेगाव : शरद पवार तीन दिवस बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. सुप्रिया सुळे लोकसभेला विजयी झाल्यानंतर शरद पवार बारामती तालुक्यात ग्रामीण भागात दौरा करून नागरिकांशी संवाद साधत आहेत. आज त्यांनी माळेगावात नागरिकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी भरघोस मतदानाबद्दल सर्वांचे आभारही मानले.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, अलीकडच्या काळामध्ये माझं गाव कोणतं विचारलं, तर जसा काटेवाडीचा उल्लेख करावा लागतो, तसा माळेगावचा उल्लेख करावा लागतो. घरदार, शेती सर्व तुमच्या कार्यक्षेत्रात आहे. १९६७ साली कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर मी या भागात तरुण पिढीत काम करत होतो. ते काम करत असताना महाराष्ट्राच्या विधानसभेला उभे राहावं अशा प्रकारची सूचना काही मित्रांनी केली आणि काँग्रेस पक्षाने त्या वेळेला उमेदवार म्हणून माझी निवड केली.
पहिली निवडणूक संघर्षाची होती, पण या तालुक्याच्या जनतेने विशेषतः तुम्ही लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि निवडणुकीची सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. मला आठवतंय, आमचे अनेक जीवाभावाचे सहकारी या ठिकाणी होते. आज काही हयात नाहीत. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एखादी महत्त्वाची कामगिरी एखादं गाव करतं, त्याच्यामध्ये माळेगावचा उल्लेख हा माझ्या अंतःकरणात कायम राहिलेला आहे. या गावाने नेहमी विकासाला साथ दिली, संसार उभा केला असेही शरद पवार म्हणाले.











