बारामती : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीच्या पक्ष फाटाफुटीनंतर इंदापूर तालुक्यात व बारामती तालुक्यात राष्ट्रवादीचे मूळ पदाधिकारी सगळेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. आता नव्याने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बांधणी सुरू झाली आहे. लोकसभेनंतर त्यांचे पहिले मिशन आहे, भवानीनगरचा श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना!
आजच कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांच्या आभार मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी याची घोषणा केली. आता लागलीच भवानीनगरचा श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना त्याची निवडणूक आपण लढणार आहोत, अशी घोषणाच सुळे यांनी केली. ज्याचे उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
या घोषणेमुळे आता राष्ट्रवादीच्याच दोन गटात छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीचे घमासान होणार आहे. अर्थात कारखान्यातील प्रबळ विरोधक व साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक माजी अध्यक्ष अविनाश घोलप यांची काय भूमिका राहणार? ते स्वतंत्र राहणार की सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत जमवून घेणार? याची देखील चर्चा लगेच सुरू झाली.
मात्र एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीनंतर लागलीच आता ग्रामपंचायतीपासून ते महानगरपालिका पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष निवडणुका लढवणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले असून त्यातही त्यांनी पहिली निवडणूक छत्रपती कारखान्याची असेल असे बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बिनीचे शिलेदार कोण असतील? तालुक्यातील कोणते कोणते विरोधक एकत्र येतील याची आत्तापासूनच चर्चा सुरू झाली आहे.
जर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल उभे राहिले व ते उभे करताना साखर उद्योगाचा गाढा अभ्यास असलेल्या पृथ्वीराज जाचकांसोबत युती झाली, तर खूप काही वेगळे घडू शकते, असा अंदाज आतापासूनच व्यक्त केला जाऊ लागला आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शेतकरी कृती समितीला असलेली शेतकऱ्यांची सहानुभूती आणि मातब्बर असलेला घोलप गट या निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.











