सातारा : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्रातील महायुतीच्या सुमार कामगिरीनंतर राज्यातील एका भाजप नेत्याने आपल्याला सरकारमधून मोकळं करा, महाराष्ट्रात कमबॅक करण्यासाठी मला सत्तेमधून मोकळं करा अशी मागणी केली होती. यावर राज्यभरातून विविध नेत्यांकडून अगोदरच टीका होत असताना मराठमोळे अभिनेते किरण माने मागे राहतील कसे?
त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टची सध्या महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. तुम्ही तेव्हाच राजीनामा देऊन मोकळं व्हायला हवं होतं.. या टॅगलाईन खाली त्यांनी बरंच काही लिहिलं आहे आणि अगदी शेवटी महाराष्ट्राचे राजकारण विषारी करण्यात तुमचा खुप मोठा हात आहे, हे सत्य अख्खा महाराष्ट्र जाणतो अशा स्वरूपात अप्रत्यक्ष टीका केली आहे.
किरण माने यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर जी पोस्ट केली आहे, ती सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. यामध्ये किरण माने यांनी महाराष्ट्रात घडलेल्या पाठीमागील घटनांचा संदर्भ दिला आहे. किरण माने या पोस्टमध्ये काय म्हणतात, ते पाहूयात. ही पोस्ट जशीच्या तशी खालीलप्रमाणे…
जेव्हा अंतरवाली सराटीत शांततेत आंदोलन करणार्या आमच्या आईबहिणभावांवर पोलिसांनी विनाकारण जीवघेणा लाठीचार्ज केला तेव्हाच तुम्ही राजीनामा देऊन ‘मोकळं’ व्हायला हवं होतं….जेव्हा सातार्यात पुसेसावळीमध्ये एका निष्पाप मुस्लीम मुलाची धर्मद्वेषी लोकांनी निर्घुण हत्या केली, तेव्हाच तुम्ही राजीनामा देऊन ‘मोकळं’ व्हायला हवं होतं.
जेव्हा कोल्हापूरसारख्या शाहुराजाच्या भुमीत बाहेरून गुंड आणून दंगल घडवली गेली, तेव्हाच तुम्ही राजीनामा देऊन ‘मोकळं’ व्हायला हवं होतं….जेव्हा ठाण्यात आणि मुंबईत दिवसाढवळ्या गोळीबार झाले, तेव्हाच तुम्ही राजीनामा देऊन ‘मोकळं’ व्हायला हवं होतं.
…जेव्हा ललित कला केंद्रातल्या मुलांवर नाटक सुरू असताना हल्ला झाला,तेव्हाच तुम्ही राजीनामा देऊन ‘मोकळं’ व्हायला हवं होतं. जेव्हा ‘निर्भय बनो’च्या कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला झाला, तेव्हाच तुम्ही राजीनामा देऊन ‘मोकळं’ व्हायला हवं होतं. पोर्श कार अपघातानंतर ते प्रकरण दाबण्यासाठी तुमच्याच माणसांनी प्रयत्न केलेल्याचा पर्दाफाश झाला, तेव्हाच तुम्ही राजीनामा देऊन ‘मोकळं’ व्हायला हवं होतं.
नाही. इतरही अनेक गोष्टी आहेत, त्यासाठी आम्ही तुमचा राजीनामा नाही मागणार. तुमच्या शिर्षस्थ नेत्यावर टीका करणार्या एखाद्या नटाला सिरीयलमधून काढण्यासाठी तुमचा फोन जाणं… प्रचंड व्होटिंग होऊन एक ‘रिॲलिटी शो’ जिंकू पहाणार्या लोकप्रिय कलाकाराला जिंकवू नये म्हणून तुमचा फोन जाणं… या सर्वसामान्य कलाकारांच्या पोटावर पाय आणणार्या नीच गोष्टी आम्ही नगण्य मानतो.
‘त्या घडल्याच नाहीत’ हे सिद्ध करण्याइतकी तुमची यंत्रणा शातीर आहे. कुटीलपणा हा तुमच्या संस्कारांचा भाग आहे. त्यासाठी आम्ही तुमचा राजीनामा नाही मागत. पण, तुम्ही कावेबाज आहात. महाराष्ट्राचे राजकारण विषारी करण्यात तुमचा खुप मोठा हात आहे, हे सत्य अख्खा महाराष्ट्र जाणतो.
‘मला मोकळं करा’ हा तुमचा निव्वळ खोटा डाव आहे. तुम्ही पैसे वाटलेले कार्यकर्ते ‘पेड’ आंदोलनं करतील, ‘साहेब जाऊ नका’ वगैरे… मग तुम्ही फोन करून काही नेत्यांना तुमच्या बाजूने भावनिक ‘बाईटस्’ द्यायला लावाल. तुमच्या बुडाला आणि खुर्चीला भ्रष्ट फेवीकाॅल लागलेले आहे, खुद आपसे वो टुटेगा नहीं…वो पब्लीक तोडेगी ! क्यों की ये पब्लीक है, ये सब जानती है….











