बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना सुप्रिया सुळे यांनी पहिल्या फेरीमध्ये 7000 मतांची आघाडी घेतली आणि बारामतीच्या कामगार आणि वंजारवाडी च्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की, सुप्रिया सुळेंचा हा विजयाचा आनंद हत्तीवरून लाडू वाटप करून साजरा करायचा.
आज संध्याकाळी साडेतीनच्या दरम्यान बारामतीच्या पेन्सिल चौकामध्ये खरोखरच हत्ती अवतरला. अगदी मिरवणूक काढून हत्तीवरून लाडू वाटप करण्यात आले. सुप्रिया सुळे यांचा विजय तब्बल दीड लाख मतांनी झाल्यानंतर बारामती तालुक्याने सुप्रिया सुळे यांना मोठे मताधिक्य दिले, याचाही आनंद या निमित्ताने साजरा करण्यात आला.
आज पर्यंत प्रत्येक लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीच्या वेळी इतर मतदारसंघात काय चाललंय याचा बारामतीकर अंदाज घ्यायचे आणि त्यावर चर्चा व्हायची पन्नास वर्षाची पहिली निवडणूक होती ज्यावेळी बारामतीकर अस्वस्थ होते आणि त्यांना बारामतीत काय घडणार याची उत्सुकता होती. बारामतीचा गड अखेर शरद पवारांनी राखला.
बारामती साहेबांचीच यावर लोकांनी शिक्कामोर्तब केले. पण अजूनही बारामतीकर फारसे बोलायला तयार नाहीत. एकीकडे सुप्रिया सुळे यांना लोकसभेत निवडून दिला असलं तरी आपल्या लोकनेत्याला देखील धक्का बसला याचं दुःखही बारामतीकरांना आहे. मात्र यावेळी साहेबांना सोडायचं नाही असाच संदेश बारामतीच्या मतदारांनी दिला.
हा विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी कामगार, ग्रामस्थ, समर्थक, हितचिंतक आणि कार्यकर्त्यांनी आज दुपारी बारामतीच्या विद्यानगरी चौकात गर्दी केली होती.
हत्तीवरून लाडू वाटप होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे समर्थक तुकाराम चौधर यांनी सांगितले की, ही निवडणूक पवारसाहेब विरुद्ध भाजप, पवारसाहेब विरुद्ध नरेंद्र मोदी अशी होती. निवडणुकीच्या काळात भाजपने पवार साहेबांना संपवण्याची भाषा वापरली, इतर विरोधकांनी देखील असभ्य भाषा वापरली आणि बारामतीकरांना हे रुचले नाही. गेली पाच दशके ज्या पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली बारामती आहे, तीच बारामती राखण्याचे काम मतदारांनी केले. म्हणूनच हा आनंद हत्तीवरून लाडू वाटप करताना आम्ही घेतला.











