विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : राज्याच्या रिक्त असलेल्या सहकार आयुक्तपदी भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी बारामती तालुक्यातील माळेगाव येथील दीपक रामचंद्र तावरे यांच्या नियुक्तीचे आदेश सोमवारी शासनाने जारी केले.
तत्कालीन सहकार आयुक्त अनिल कवडे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर सहकार आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार सहकार विभागातील ज्येष्ठ अधिकारी व सहकारचे अपर आयुक्त शैलेश कोथमिरे यांच्याकडे देण्यात आला होता. आता दीपक तावरे यांच्या नियुक्तीने सहकार आयुक्तपदी पूर्णवेळ अधिकारी मिळाल्याने कामकाजास गती मिळणार आहे.
दीपक तावरे यांची राज्य वखार महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन मुंबई येथे राज्य कामगार विमा योजना येथे आयुक्तपदी बदली झाली होती. त्यानंतर पुण्यात यशदाच्या उप-महासंचालक पदी बदली झाली होती. या दोन्ही पदांवर ते रुजू झाले नव्हते. आता शासनाने त्यांची नियुक्ती सोमवारी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे या रिक्त पदावर केलेली आहे. हे पद कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत अवनत करुन ही नियुक्ती केल्याचे आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सेवा नितीन गद्रे यांनी काढले आहेत.
दीपक तावरे यांनी सहकार विभागात यापुर्वी विविध पदे भूषविली असून पुणे विभागीय सह निबंधक, साखर सहसंचालक या पदावर त्यांनी काम केले आहे. भारतीय प्रशासन सेवेत नियुक्त झाल्यानंतर प्रथम त्यांची राज्याच्या पणन संचालक पदी नियुक्ती झाली होती. सोलापूर महापालिकेचे आयुक्त पदही त्यांनी भूषविले. त्यानंतर त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून झाली. त्यांच्या कारकिर्दीत महामंडळाचा समृध्दी महामार्गावर लॉजिस्टिक पार्कचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविला गेला आहे.











