सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
काल दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला. अगदी 100% पर्यंत मुलांना मार्क देखील पडले. काही ठिकाणी तर 50% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची सुद्धा जेसीबीतून मिरवणूक निघाली. इंदापूर तालुक्याच्या लासुर्णे गावातील एका वंचितांच्या वस्तीवरही आनंदीआनंद झाला, कारण मितालीला तब्बल 80 टक्के गुण मिळाले. पारधी समाजातील मुली सुद्धा किती हुशार आहेत याची चुणूक दाखवणारी ही घटना आहे, इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावची!
कोणत्याही अतिरिक्त शिकवणीशिवाय आणि कोणतेही शिक्षणातले फाजील लाड नसताना मिताली खलील काळे हिने मिळवलेले यश इतर कोणाच्याही यशापेक्षा अधिक चमकणारे आहे. लासुर्णे येथील नीलकंठेश्वर विद्यालयात शिकणारी मिताली घरच्या 12 विश्व दारिद्र्याला न जुमानता स्वतःचे आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचेही भवितव्य बदलण्यासाठी प्रचंड जिद्दीने अभ्यास करत होती. त्यामध्ये तिला घवघवीत यश मिळाले
मितालीची आई आशा खलील काळे व खलील भागवत काळे हे मजुरी करतात. मितालीने शिकावं पारंपारिक जोखडातून मुक्त व्हावं आणि शिकून मोठे साहेब हवे अधिकारी व्हावे अशी तिच्या आईची उदंड इच्छा. आईने मोलमजुरी करून त्या पैशातून तिच्या शिक्षणाचा खर्च केला. या शिक्षणाच्या खर्चाची जाणीव ठेवून कोणत्याही अतिरिक्त शिकवणीशिवाय तिने हे यश मिळवले आहे.
प्रज्ञाशोध परीक्षेतही तिने यापूर्वी यश मिळवलेले होते. त्यासाठी तिला शिष्यवृत्ती देखील मिळाली होती.
मितालीला डॉक्टर होण्याची इच्छा आहे. समाजामध्ये डॉक्टरांची संख्या अगदीच नाही. त्यामुळे डॉक्टर होऊन समाजातील अनारोग्य दूर करण्याची तिची इच्छा आहे. त्यासाठी आता तिला विज्ञान शाखेतून बारावी पूर्ण करायची आहे. मात्र तिला आता पैशाची आवश्यकता भासणार आहे. समाजातील दातृत्वाचे हात पुढे आले तर वंचित घटकातील एक हुशार मुलगी आपल्या आयुष्यातील करियर साध्य करून समाजसेवेसाठी व आपल्या समाजातील इतर वंचितांना पुढे आणण्यासाठी झटू शकते, मात्र त्यासाठी दातृत्वाचे हात पुढे पाहिजेत.
(ज्यांना तिला आर्थिक मदत करायची असेल त्यांच्यासाठी तिच्या बँक अकाउंट चा क्रमांक पुढील प्रमाणे, Name : Miss mitali khalil kale
Acc : 68020868784. Ifsc: mahb0000828
Bank of maharashtra, lasurne branch. या व्यतिरिक्त अधिक संपर्कासाठी : संग्राम काळे – +91 97661 72181 )











