उजनीच्या पात्रातील करमाळा तालुक्यातील कुगाव ते इंदापूर तालुक्यातील कळाशी या दरम्यानच्या ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे बोट उलटली. या बोटीमध्ये सात प्रवासी होते. त्यापैकी एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला आपला जीव वाचवण्यात यश आले. मात्र तब्बल सहा जण भीमा नदी व उजनीच्या पात्रात बुडाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान या घटनेत दोन लहान मुलांसह एक महिला व तीन पुरुषांचा समावेश असल्याचे सांगितले जात असून या ठिकाणी इंदापूरसह पुणे जिल्ह्यातील व सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा महसूल यंत्रणा व पोलीस यंत्रणा बचाव कार्यात पोचली आहे. दरम्यान राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन पथकाला देखील दोन्ही जिल्ह्यातून पाचारण करण्यात आले असून काही वेळातच हे दोन्ही ठिकाणची पथके या ठिकाणी पोहोचतील असे सांगितले जात आहे.
आज संध्याकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांचाही समावेश होता. मात्र बोट उलटताच त्यांनी प्रसंगावधान राखत शिताफीने पोहत यातून मार्ग काढला, मात्र ते देखील उजनीच्या काठाजवळ येताच गाळात रुतल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांनी दिली.
स्थानिक ठिकाणाहून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत कुगाव येथील एक दाम्पत्य कळाशीकडे येत होते. कळाशी येथील माहेर वाशिण महिला तिच्या दोन मुलांसह व पतीसह माहेरी येत असताना दीपत्य झाले असल्याने कळाशी गावातील या महिलेच्या कुटुंबीयांसह व नातेवाईकांसह सर्व ग्रामस्थ उजनी काठावर थांबून आहेत.
दरम्यान येथील बचाव कार्यावर पुणे जिल्ह्यातील व सोलापूर जिल्ह्यातील अधिकारी लक्ष ठेवून आहेत. स्थानिक मच्छीमारांची तसेच पाणबुड्यांची देखील मदत घेतली जात असून स्थानिक नागरिकही या ठिकाणी बचाव कार्यासाठी थांबून आहेत.











