सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
उजनीच्या पात्रात काल संध्याकाळी सहा वाजता बोट उलटून सहा जण बुडाले आहेत. ते अजूनही बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी उजनीच्या पात्रात एनडीआरएफ ची पथके, पाणबुड्या तसेच प्रशिक्षित बचाव पथकांचे काम चालू आहे मात्र आता घटनेला 22 तास होत आल्याने करमाळा तालुक्यातील कुगाव परिसरातील नातेवाईक व ग्रामस्थांचा धीर खचू लागला आहे.
त्यांनी आज दुपारी तीन वाजता इंदापूर तालुक्यातील काळाशीच्या पात्राकडे येऊन अधिकाऱ्यांशी हुजत घातली. तुमचे अधिकारी व कर्मचारी खूप कमी आहेत, त्यांची संख्या वाढवा, जर वेळ लागला तर आमची माणसं हाती येणार नाहीत अशी भीती त्यांनी व्यक्त केली. यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तेथील युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
सकाळपासून एनडीआरएफची पथके केवळ टाईमपास करत आहेत असा देखील आरोप या नातेवाईक व ग्रामस्थांनी केला. मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी त्यांना समजावून सांगितले, तसेच घटना ज्या परिस्थितीत घडली आहे ते पाहता प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचीच येथे गरज असून पुरेसे मनुष्यबळ या ठिकाणी काम करत आहे त्यांना तुम्ही सहकार्य करा असे आवाहन केले.
एकंदरीतच आता 22 तासांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. दोन लहान मुले एक महिला आणि तीन पुरुष अशा सहा जणांच्या बेपत्ता होण्याने त्या भागातील ग्रामस्थ व नातेवाईकांचा आक्रोश वाढत चालला आहे.











