ज्ञानेश्वर रायते : महान्यूज लाईव्ह
पुण्यात मध्यरात्री पहाटेच्या अडीच वाजता आलिशान पोर्शे कार मधून बांधकाम व्यवसायिकाचा दारुडा पोरगा त्याच्या मस्तीत गाडी चालवतो, दोन जणांना उडवतो.. नव्हे त्यांचा जीव घेतो.. ज्यांची मुलं मेलेले असतात त्यांचा टाहो ऐकवता ऐकत नाही आणि दुसरीकडे जमावाने मारलेल्या पोराच्या अंगदुखीवर उपाय म्हणून क्रोसिन ची गोळी घेऊन तो बडा बाप आणि त्याची आई जातात. एक आमदार तर हे प्रकरणच पोलिसांच्यात जाऊ नये म्हणून दबाव आणू पाहतो, तेव्हा रविवारच्या पहाटे पुण्याची कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगलेली दिसतात, कारण पंधरा तासांतच त्याला जामीन मिळतो.. अख्ख्या जगाला ज्ञान पाजळणाऱ्या पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे आता वेशीवर टांगली गेली आहेत.
पुण्यातील बांधकाम व्यवसायिक विशाल अग्रवाल याचा मुलगा वेदांत याच्या हिट अँड रन मुळे आयटी अभियंता अनिस अवधिया व त्याची मैत्रीण अश्विनी कोष्टा या दोघांचा रविवारी पहाटे जीव गेला. या प्रकरणात आश्चर्यकारक अशा अटी आणि या अटी द्वारे जामीन मिळाला आणि साऱ्या पुण्यात नव्हे, अख्ख्या राज्यात खळबळ उडाली. पंधरा दिवस पोलिसांसोबत राहून रस्त्यावरचे नियम पाळावेत, त्याचबरोबर वाहतुकीच्या नियमांसाठी वेळ द्यावा निबंध लिहावा अशा वेगवेगळ्या अटी या सतरा वर्षाच्या पोराला कोर्टाने घालून दिलेल्या आहेत.
कायद्यात दिलेल्या कलमानुसार हे सारे योग्य असले, तरी सामान्यांच्या बाबतीत हाच न्याय पोलिसांनी लागू केला असता का? हा प्रश्न मात्र साऱ्यांच्याच जिव्हारी लागला आहे. रविवारी एका आमदाराने या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून प्रयत्न केला. आज काँग्रेसचा आमदार पुण्याच्या येरवडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करणार आहे.
काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी यासंदर्भात पोलिसांवर ठपका ठेवला आहे. दोन निष्पाप जीवांचा जागीच मृत्यू झाला, तरी देखील पोलिसांनी त्या बांधकाम व्यवसायिकाची आणि त्याच्या मुलाची बाजू उचलून धरली. जी कलमे लावणे गरजेची होती, ती लावली नाहीत. त्यामुळे मुलाला लगेच जामीनही मिळाला. असे सांगून या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी रवींद्र धंगेकर हे ठिय्या आंदोलन करणार आहेत.
आता ज्याला जामीन मिळायचा त्याला मिळाला. पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेची राज्यभर देशभर लक्तरे टांगली गेली, तरीदेखील अजूनही बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल ला अटक झाली नाही त्याचाही संताप सामान्य लोकांमध्ये आहे. मोठ्याचं लेकरू काहीही करू शकतं असाच समज या निमित्ताने सामान्य लोकांमध्ये पसरला आहे. पोलीस मात्र बड्या बड्या बाता मारत आहेत असेच लोक म्हणू लागले आहेत.
सतरा वर्षाच्या पोराला मध्यरात्रीच्या वेळेस दारू कोणी दिली? याचा अजूनही तपास सुरूच आहे. या सगळ्याकडे ज्यांना गंभीर म्हणावं अशी धोरणकर्ते मंडळी सोयीस्कर डोळेझाक करताना दिसत आहेत. कारण पुण्यातील निवडणूक संपलेली आहे. त्यामुळे याच्याकडे राजकारण म्हणून न पाहता समाजातील अत्यंत महत्त्वाची बाब म्हणून पाहण्याची आवश्यकता आहे. मात्र त्याचे कोणालाच सोयरसुतक नसावे, कारण एक आमदार आरोपींच्या बाजूने चक्क उभा राहतो आणि पुण्यातील राज्याचे राजकारण पाहणारी एकही मंडळी पुढे येत नाहीत हे दुर्दैवाचे आणि नीचपणाचे आहे. कदाचित हे आयटी इंजिनिअर आपल्या भागातील नसावेत म्हणून देखील त्याकडे डोळेझाक होते का?
यानिमित्ताने नुकतीच घडलेली एक घटना आठवली. बारामती तालुक्यात शेजारच्या जमीनमालकाने आपला गडी पाठवून एका शेतकऱ्याविरोधात भांडण करायला लावले. किरकोळ भांडण होताच गडी पोलीस ठाण्यात गेला. ॲट्रॉसिटी ची तक्रार दिली आणि पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे, त्याच शेतकऱ्याला अनेक वेळा फोन करून दमबाजी करू लागला.
भीतीपोटी त्या शेतकऱ्याने औषध पिऊन आत्महत्या केली. याला अजून काही दिवस होत नाहीत, तोवरच त्याच्या नेमकी उलटी घटना पुण्यामध्ये घडते आहे. ज्याच्याकडे पैसे आहेत, त्याने अतिशय गंभीर गुन्हा दाखल केला असला, तरी त्याच्यासाठी लाल गालीचे अंथरणारी ही व्यवस्था पाहिली, की तळपायाची आग मस्तकाला गेल्याशिवाय राहत नाही.
खरे तर कातडी बचाव धोरण प्रत्येकाला स्वीकारता येते. कायद्याने आमचेच बरोबर आहे, हे पोलीस सांगूही शकतात. पटवू शकतात आणि त्यांची बाजूही बरोबर दिसू शकते, परंतु प्रत्येकाच्याच बाबतीत समान न्याय का मिळत नाही? ही सामान्य जनतेची पक्की धारणा तुम्ही कितीही तुमच्या बाजूचा प्रकाश टाकला तरी बदलणार नाही. अशा घटनांमुळे तर ती अधिकच बळकट होत जाईल. कायदा आणि सुव्यवस्था सर्वांसाठी सारखी आहे हे दाखवण्याची जबाबदारी आता पुण्याच्या पोलिसांची आहे.!











