सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : स्वतःच्या सामायिक मालकीच्या क्षेत्रातून राजरोसपणे बेकायदेशीररित्या जवळपास 5000 ब्रास मुरूम व माती उत्खनन केल्याची तक्रार केल्याचा रागातून सात गावगुंडांनी १६ मे रोजी मध्यरात्री घरात घुसून पती-पत्नी व सासरे यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घडल्या प्रकाराने सदरचे कुटुंब भयभीत झाले आहे महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप सदर अन्यायग्रस्त कुटूंबाने केला असून बेकायदेशीर उत्खनन व मारहाण केल्याप्रकरणी सात जणांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यशोदा नवनाथ सांगळे यांनी केली आहे.
यशोदा नवनाथ सांगळे (वय३५) , पती नवनाथ बन्याबा सांगळे (वय ४०) व सासरे बन्याबा बाबु सांगळे (वय ७० सर्व रा.बिरंगुडवाडी पो.कळस, ता.इंदापूर) यांना मारहाण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत यशोदा सांगळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आमच्या मालकी हक्काच्या मौजे बिरंगुडवाडी येथील समाईक मालकीच्या गटातुन (गट नं. २९५ ) शासनाची किंवा आमच्या परवानगीशिवाय जवळपास पाच हजार ब्रास मुरुमाचे व मातीचे उत्खनन केल्याचा आरोप केला आहे.
माझ्या क्षेत्रातील मुरुम का उचलत आहे,असे गटातील इतरांना विचारले व याची तक्रार मी तहसिलदार साहेबांकडे करील, असे तक्रारदाराचे पती नवनाथ सांगळे यांनी म्हटले असता, त्यांनी मला व माझे पती व सासरे यांना मारहाण व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. तुला काय करायचे ते कर, माझी तहसिलदार, प्रांत, महसुल मंत्री व महसुल मंत्र्यांचे ओ.एस.डी. पर्यंत सबंध आहेत. मी मुरुम उचलण्यासाठी, तहसीलदार यांना मोठी रक्कम दिली आहे. ते तुझी तक्रार पण घेणार नाहीत उलट आम्ही तुझ्या कुटुंबावरती खोटे केसेस दाखल करु. असे दममदाटी करत आम्हाला आमच्या रानातुन मारत बाहेर काढले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. माझ्या कुटुंबाच्या जीवास काहीही धोका झाल्यास वरील तिन्ही इसम तहसिलदार, प्रांत, महसुल मंत्री व महसुल मत्र्यांचे OSD यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी यशोदा सांगळे यांच्या कुटुंबाची आहे.
सदर क्षेत्रातील माती उचलण्याची कोणतेही परवानगी नाही. तरी या गुंड प्रवृत्तीच्या माणसांवर इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी कायदेशीर करवाई करुन, फौजदारी गुन्हे व गौण खनिज चोरीचा गुन्हा दाखल करावेत अशी मागणीही करण्यात आली आहे.
यानंतर याबाबत महसुल मंत्री महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हाधिकारी, पुणे खनीकर्म शाखा, उपविभागीय अधिकारी बारामती, वालचंदनगर पोलीस ठाणे जंक्शन इंदापूरचे तहसिलदार यांचेकडे तक्रारी अर्ज दिला.यानंतर बेकायदेशीर मुरूम माती उत्खनन करणाऱ्यांना हे सहन झाले नाही व दिलेल्या तक्रारी अर्जाचा राग मनात धरून, बुधवारी (दि.१६ मे २०२४) रात्री १.३० वाजता आमच्या बिरंगुडवाडी येथील घरात घुसून सात जणांनी कुटूंबातील तिघांना मारहाण करण्यात आली आहे.
त्याच रात्री २ वाजण्याच्या सुमारास वालचंदनगर पोलीस पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो असता, तेथील पोलीस कर्मचारी यांनी आमच्यावर उपचार केले. जबाब नोंदवून घेतले. मात्र मारहाण करणाऱ्या गुंडांवर कोणतीही कारवाई केली नसून, त्या गुंडाकडून माझ्या कुटुंबाच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. तरी पोलिसांनी आम्हांला सुरक्षा द्यावी व त्या गुंड प्रवृत्तीच्या माणसांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या बेकायदेशीर मुरूम माती उपसा करणाऱ्यांवर खरंच महसूल व पोलीस प्रशासन कारवाई करणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.











