दौंड, महान्यूज लाईव्ह
पुणे सोलापूर महामार्गालगत कुरकुंभ येथे दौंड पोलिसांनी वेश्या व्यवसायावर कारवाई केल्यानंतर आता यवत पोलिसांनी केडगाव – चौफुला हॉटेल सागर बियरबार आणि लॉज वर छापा टाकून वेश्याव्यवसायचा पर्दाफाश केला. या प्रकरणी यवत पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
ही माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली. वैभव दिपक पाटील (वय २४, सध्या रा. सागर लॉज केडगाव ता. दौंड ,जि पुणे मुळ रा. टेंभुर्णी ता. माढा जि. सोलापुर) व अक्षय विलास मांढरे (वय २३.रा.वरवंड ता . दौंड .जि.पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत .
पुणे सोलापूर महामार्गालगत दौंड तालुक्याच्या हद्दीत असलेल्या काही हॉटेल आणि लॉजवर आता वेश्या व्यवसाय सुरू असल्याचा उघड होत आहे. यवत पोलिसांनी केडगाव हद्दीतील हॉटेल सागर बार आणि लॉजवर गुरुवारी (दि १६) छापा टाकला असता आरोपी हे एका मुलीकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे निदर्शन आले.
पिडित मुलीला पैशाचे आमिष दाखवून हे दोघेजण वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत होते. या छाप्यात पोलिसांनी 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यवत पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई प्रणय ननवरे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने आरोपींवर स्त्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.











