पुणे : महान्यूज लाईव्ह
सातारा, बारामती व शिरूर या राष्ट्रवादीच्या दोन पक्षांमधील हायहोल्टेज निवडणुका असलेले मतदारसंघ. या मतदारसंघातील निवडणुका झाल्यानंतर देखील आरोप प्रत्यारोपाची धूळ आता अजूनही थांबत नाही. आता हे आरोप होऊ लागले आहेत प्रशासनावर! मतदान झाल्यानंतर ज्या ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवले आहेत, तेथील सीसीटीव्ही कॅमेरे व त्यांच्या स्क्रीन बंद असल्याचे प्रकार घडले आहेत.
साताऱ्यामध्ये स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्हीचे स्क्रीन बंद झाल्यानंतर बारामतीमध्ये देखील ते बंद पडले होते. साहजिकच त्याची मोठी चर्चा झाली. माध्यमांमध्ये चर्चा झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याने याचा खुलासा देखील केला. मात्र अत्यंत संवेदनशील असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीच कामे कसे निघतात असा प्रश्न उपस्थित झाला होता.
बारामतीत प्रशासनाने या संदर्भात खुलासा केला, परंतु त्यानंतर आता शिरूर मध्ये देखील 24 तासापेक्षा अधिक काळ हे सीसीटीव्ही बंद झाल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या संदर्भात कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत प्रशासनाला व निवडणूक आयोगाला या संदर्भात चौकशी करण्याची विनंती केली आहे.
मात्र यामुळे सातत्याने प्रश्न निर्माण होत आहेत. ज्या ठिकाणी अतिशय संवेदनशील पद्धतीने लोकांची नजर आहे आणि मतदारसंघातील निवडणुका हाय व्होल्टेज अशा स्वरूपाच्या आहेत, त्या ठिकाणी कोणतीही संदेहाची किंवा संभ्रमाची बाजू प्रशासनाने निर्माण होऊ देता कामा नये. मात्र असे सतत का घडते? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.
या संदर्भात रोहित पवार यांनी केलेले ट्विट पुढील प्रमाणे, बारामतीनंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या सीसीटीव्ही २४ तास बंद ठेवल्याचा प्रकार समोर आला. आपल्याला एकही जागा जिंकता येणार नाही हे लक्षात आल्यानेच एका गटाकडून तर हे केले जात नाही ना?. असो. प्रशासनाने स्ट्रॉंग रूमची सुरक्षा वाढवून गेल्या २४ तासात सीसीटीव्ही का बंद ठेवण्यात आले? याची चौकशी करावी. अशी विनंती रोहित पवार यांनी या ट्विटमध्ये केली आहे.











