बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील गुणवडी येथील एका दांपत्यासह तिघा जणांनी फलटण तालुक्यातील राजाळे येथील एका गुंतवणूकदारास शेअर मार्केटमध्ये दुप्पट पैसे करून देतो, म्हणून पैसे गुंतवण्याचे अमिष दाखवले आणि दोन लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फलटण तालुक्यातील राजाळे येथील वैभव मारुती ननवरे यांनी फिर्यादी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी ननवरे यांच्या फिर्यादीवरून विजय वसंत कुंभार, शुभांगी विजय कुंभार व विशाल बाळू भोसले (तिघेही रा. गुणवडी ता. बारामती जि. पुणे) या तिघांविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
या तिघांनी 6 ऑक्टोबर 2023 पासून कालपर्यंत गुणवडीतील देवराज देवभूमी अपार्टमेंट येथील त्यांच्या कार्यालयात फिर्यादी वैभव ननवरे यांना शेअर मार्केटचे महत्त्व सांगून व गुंतवणुकीतील दाम दुप्पट परताव्याचे अमिष दाखवून गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. वैभव ननवरे व त्यांच्या आईने वेळोवेळी मिळून दोन लाख दहा हजार रुपयांची रक्कम गुंतवली. या रकमेपोटी प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला प्रति लाख 12 हजार रुपयांचा परतावा देण्याचे अमिष या तिघांनी दाखवले.
ही रक्कम तुमच्या खात्यात परत करणार आहोत व उर्वरित रक्कम 11 महीन्यामध्ये दुप्पट होईल असे सांगून माझी व माझ्या आईची गुणवडी येथील विजय वसंत कुंभार, शुभांगी विजय कुंभार व विशाल बाळु भोसले यांनी संगनमत करून फसवणूक केली व फोनवर संपर्क साधून पैशाची मागणी केली असता, पोलीस केस करू नका. जर पोलीस केस केली आणि आम्ही जेलमध्ये गेलो तर तुम्हाला रुपया देखील भेटणार नाही अशी धमकी दिली, अशा स्वरूपाची फिर्याद ननवरे यांनी पोलीस ठाण्यात दिली. घटनेचा पुढील तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.











