दौंड ,महान्यूज लाईव्ह
महिलेला जाता येता पाठलाग करत अडवून, छेडछाड करणाऱ्या दौंड शहरातील माजी नगराध्यक्षाच्या एका जवळच्या कार्यकर्त्यावर दौंड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांकी जैन (रा. नैने चाळ, दौंड) असे गुन्हा दाखल झालेल्या नराधमाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शांकी जैन हा फिर्यादी महिलेचा वारंवार पाठलाग करून त्रास देत होता, तसेच मोबाईलवर कॉल करून तिला त्रास देत होता. दरम्यान, फिर्यादीच्या घराचा दरवाजा वाजवून जैनने ‘मला तू आवडते. तुझ्यासोबत बोलायचे आहे,’ असे म्हणत तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पीडित महिलेच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी शांकी जैन याच्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत. दरम्यान, विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपी शांक जैन याच्यावर यापूर्वी दौंड पोलीस ठाण्यात मटक्याचे आकडे खेळल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तसेच जैन हा एका माजी नगराध्यक्षाच्या अगदी जवळचा आणि विश्वासू कार्यकर्ता असून राजकीय आशीर्वादाने त्याचे मटक्यासारखे अनेक अवैद्य धंदे सुरू आहेत, तसेच जमिनी खरेदी-विक्री करणे शेतकऱ्यांची फसवणूक करणे असे प्रकार करीत असल्याची चर्चा दौंड शहरात आणि तालुक्यात आहे.
मध्यंतरी तत्कालीन गटशिक्षणाधिकारी स्वर्गीय किसन भुजबळ यांनी बोगस पटसंख्या असलेल्या शाळांवर कारवाई केली होती. यामध्ये जैन हा मालक असलेल्या शाळेचाही समावेश होता. दरम्यान संबंधित विनयभंगाची तक्रार मागे घेण्यासाठी आणि ही तक्रार दाखल होऊ नये यासाठी त्याने मोठा राजकीय दबावही आणला होता. अशी चर्चा दौंड शहरात आहे.











