सांगली – महान्यूज लाईव्ह
घटना सांगली जिल्ह्यातील आहे, तसंही सांगली जिल्ह्यात चित्रविचित्र घटना काही नव्या नाहीत. मात्र नवराबायकोतील विचित्र भांडणाची घटना सांगलीत खळबळ उडवून गेली आहे.
सांगलीच्या संजयनगर पोलिस ठाण्यात दाखल या घटनेची सध्या चर्चा सुरू आहे. घटना ८ मे रोजी घडली असून पोलिस ठाण्यात नवऱ्याने धाव घेऊन गुन्हा दाखल करायला १३ मेचा दिवस उजाडला.
सांगलीच्या संजयनगर परिसरातील ही घटना असून सकाळच्या वेळी अंघोळीसाठी गेलेल्या बायकोला आंघोळीचा साबण काही सापडेना. तिने नवऱ्याला साबण कुठे ठेवलाय असे विचारले. अगोदरच दोघांत वेगवेगळ्या विषयांवरून कुरबुरी झाल्याने नवऱ्यानेही जोशातच असेल बाथरुममध्ये असे उत्तर देताच बायकोने नवऱ्याला चार शब्द सुनावले.
बायको चुकीचं बोलल्याने इगो दुखावलेल्या नवऱ्यानेही बायकोला प्रत्युत्तर दिले. शब्दाने शब्द वाढत गेला. मग भांडण शिवीगाळीवर आले. सहनशीलतेच्या पलीकडे जाताच नवऱ्याने बायकोला चापट मारली आणि इकडे रागाचा तिळपापड झालेल्या बायकोने घरातील स्वयंपाकघरातील पक्कड उचलली आणि थेट नवऱ्याच्या अंगठ्यावर जोरात वार केला.
भांडण एवढ्यावर थांबले नाही, मग थोड्या वेळाने बायकोच्या माहेरच्यांनी धाव घेतली आणि सासरा, चुलत सासरा, सासू यांनी नवऱ्याला दमदाटी केली. त्यानंतर मात्र नवरोबाने प्रसंगावधान राखून पोलिस ठाण्यात धाव घेतली.











