मुंबई : महान्यूज लाईव्ह
घटना गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील पोईचा गावांमधील आहे. या गावात सुरतवरून अमरेली जिल्ह्यातील काहीजण आले होते. पर्यटनासाठी आल्यावर देवाची पूजा करून नर्मदा नदीत अंघोळ करण्यासाठी सगळेजण उतरले आणि तब्बल आठ जण नदीत बुडाले.
या घटनेने गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे. सुरत वरून एका कुटुंबातील आठ जणांसह 17 जण देवधर्म व पर्यटनासाठी निघाले होते. नर्मदा जिल्ह्यातील पोईचा या गावामध्ये ते एका मंदिरात पूजेसाठी थांबले होते. पूजा आटोपल्यानंतर पुरोहितांनी त्यांना शूचिर्भूत होण्यासाठी सांगितले आणि ते सगळेजण नर्मदा नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी उतरले.
नदीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने सारे जण बुडाले. प्रसंगावधान राखून स्थानिक काहीजणांनी एकाला वाचवले, मात्र सात जण बुडाले. यामध्ये सहा मुले होती. सात वर्षापासून पंधरा वर्षापर्यंत ही सहा मुले होती. दरम्यान ही घटना घडल्यानंतर तातडीने पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या कर्मचारी व स्थानिक नागरिकांसह बेपत्ता लोकांच्या शोध कार्यासाठी मोहीम राबवली.











