मालकासह मॅनेजरवर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल!
दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : वाईच्या एमआयडीसीतील कोल्ड स्टोअरेज कंपनीने चक्क रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीची फसवणूक केली कंपनीने ठेवलेले बटर परस्पर विकल्याप्रकरणी व सहा कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या मालकासह व्यवस्थापकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चक्क रामदेव बाबांच्या पतंजलीला चुना लावला गेल्याने तालुक्यात देखील खळबळ उडाली असून कोल्ड स्टोअरेज मध्ये ठेवलेला माल आपण भाडेपट्ट्यावर ठेवतो, मात्र तो माल देखील स्टोअरेजचेच मालक परस्पर विकून टाकत असतील तर काय करायचे? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
पतंजली कंपनीने त्यांचा सहा कोटी रुपये अंदाजे किमतीचा बटर सन 2022 मध्ये वाई एमआयडीसीतील पी.डी. शहा कंपनीच्या कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवला होता. मात्र डिसेंबर २०२२ पासून ऑगस्ट २०२३ पर्यंत पी. डी. शाह सन्स कोल्ड स्टोअरेज प्रा. लिमिटेड या कंपनीचे मालक शहा व मॅनेजर यांनी संगनमत केले व एमआयडीसी वाई येथील त्यांच्या कोल्ड स्टोअरेज मधील पतंजली फूड्स लिमिटेड कंपनीच्या मालकीचे साठवणूक करून ठेवलेले सुमारे ६ कोटी रुपये किंमतीचे १३४.५ टन बटर परस्पर विकले.
यात कंपनीची सहा कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाली असून हा प्रकार केल्याप्रकरणी पतंजली फूड्स लिमिटेड कंपनीच्या वतीने ज्ञानेश्वर रामनाथ आढाव, (वय ४६, रा. खडके, ता. नेवासा, जि. अहमदनगर) यांनी वाई पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावरून कोल्ड स्टोअरेजचा मालक व व्यवस्थापकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण करत आहेत.











