दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने १ जूनपर्यंत अंतरिम जामीन दिला आहे. दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणी केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. त्यांनी ४ जूनपर्यंत प्रचारासाठी जामीन मागितला होता, कोर्टाने त्यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना अरविंद केजरीवाल यांना प्रचारादरम्यान खटल्यावर काहीही बोलू नये अशी अट घातली आहे. पंजाबमधील मतदान २५ मे रोजी तर दिल्लीतील मतदान १ जून रोजी संपणार आहे, त्या पार्श्वभूमीवर हा जामीन कोर्टाने मंजूर केला आहे.
ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक केली, तेव्हापासून केजरीवाल तुरूंगातच होते. दिल्ली लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर आता केजरीवाल बाहेर येत असल्याने त्यांच्या आम आदमी पार्टीला मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान तुरूंगाबाहेर येताच केजरीवाल यांचे मोठ्या गर्दीने उत्साहात स्वागत केले. यावेळी केजरीवाल यांनी मी आधीपासून लढतच आहे, आम्हाला तानाशाही व हुकुमशाहीविरोधात लढा द्यायचाच आहे, आता देश वाचविण्यासाठी तुम्हीही सारेजण यात सहभागी व्हा असे आवाहन केले.
याच दरम्यान केजरीवाल यांनी समर्थकांना व दिल्ली निवासी नागरिकांना आवाहन केले. केजरीवाल शनिवारी सकाळी ११ वाजता कॅनाट प्लेस येथील हनुमान मंदिरात आशिर्वाद घेणार असल्याचे केजरीवाल .यांनी सांगितले. दुपारी १ वाजता पक्ष कार्यालयात पत्रकार परीषद घेणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.











