शिरूर : महान्यूज लाईव्ह
महाविकास आघाडीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना एक वेगळाच प्रश्न विचारला आहे. त्यामध्ये त्यांनी जर आपण पाच वर्षाच्या पैलवानाची वीस वर्षाच्या पैलवानाची कुस्ती लावू शकत नाही तर पाच वर्षाच्या कामकाजाची वीस वर्षाच्या जनसंपर्काशी तुलना कशी करू शकता असा सवाल डॉ. कोल्हे यांनी अजित पवारांना विचारला आहे.
अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांना प्रत्युत्तर देताना प्रतिप्रश्न केला आहे. ते म्हणाले, गावागावात ग्रामदेवतांच्या जत्रा सुरू आहेत. या जत्रांमध्ये कुस्त्या असता. या कुस्ती मैदानात कुस्ती लावायची झाली, तर बरोबरीच्या पैलवानांशी लावली जाते. त्यासाठी पैलवानाला आखाड्यात फिरवले देखील जाते.
परंतु कधीही मोठ्या वयाच्या पैलवानाची छोट्या वयाच्या पैलवानाची कुस्ती लावली जात नाही. हे सगळ्यांना माहित आहे. मग पाच वर्षाच्या मुलाची अशा यात्रांमध्ये वीस वर्षाच्या मुलाबरोबर कुस्ती लावतात का? मग जर माझ्या पाच वर्षाच्या जनसंपर्काची विरोधी उमेदवाराच्या वीस वर्षाच्या जनसंपर्काशी तुम्ही तुलना करता, तर मग पाच वर्षाच्या मुलाची वीस वर्षाच्या पैलवानाची कुस्ती लावल्यासारखेच आहे. मुद्द्याचं सोडून द्यायचं आणि नको ते बोलायचं अशा शब्दात त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.
दरम्यान कोल्हे म्हणाले, तुलना केली जाते. वीस वर्षांचा जनसंपर्क आणि पाच वर्षाचा जनसंपर्क ही तुलना न करता समोर लोकांची दिशाभूल केली जाते, पण ज्या कारणासाठी उमेदवार खासदार होऊन लोकसभेत जातो, ते काम करताना अवघ्या पाच वर्षातील आमची कामगिरी समोरच्या उमेदवाराच्या १५ वर्षाच्या कामगिरी पेक्षा उज्वल आहे, हे मात्र तुम्ही सांगत नाही, असा त्यांनी पलटवार अजित पवारांवर केला आहे. विद्यमान माजी खासदारांनी पंधरा वर्षात एक तरी मोठ्या प्रकल्प शिरूर मतदारसंघात आणला का? खेड विमानतळाची जखम खेडची जनता कधी विसरू शकत नाही. हळूहळू सगळ्या गोष्टी बाहेर काढणार आहे. थोडे थांबा असे आव्हान अमोल कोल्हे यांनी दिले.











