भोसरी : महान्यूज लाईव्ह
महाविकास आघाडीचे खासदार आणि खासदारकीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या सुसंस्कृत राजकीय कौशल्याचे उदाहरण जागोजागी पाहायला मिळतं. गेल्या काही दिवसापासून तर ते पाहायला मिळतच आहे, परंतु काल भोसरीतही त्याचा प्रत्यय आला.
भोसरीमध्ये कोपरा सभेच्या निमित्ताने बोलण्यासाठी कोल्हे उभे राहणार होते, तेवढ्यात एका स्थानिक मतदाराने माईक हातात घेतला आणि कोल्हे यांना का निवडून द्यावे यावर भाषण करायला सुरुवात केली. त्यांनी भाषण करत असतानाच मध्येच शरद पवार यांची साथ सोडणाऱ्या दिलीप वळसे पाटलांवर टीका केली. सुरुवातीला ती टीका सहजपणे होती, मात्र त्यानंतर कडवट शब्द येऊ लागताच डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांना थांबवले आणि माईक हातात घेतला.
डॉ. अमोल कोल्हे यांनी तुमच्या भावना मी समजू शकतो, मात्र देशांमध्ये विरोधकांनी कितीही राजकीय असंस्कृतपणा आणि द्वेष मूलक संस्कृती आणण्याचा प्रयत्न केला, तरी आपण शिवरायांच्या विचारांचे वारसदार आहोत, त्यामुळे आपण आपला राजकीय सुसंस्कृतपणा सोडायचा नाही असे सांगितले आणि त्यानंतर उपस्थित भोसरीकरांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
काही दिवसांपूर्वी शिवनेरीवर दर्शनासाठी जात असताना प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव आणि डॉ. अमोल कोल्हे यांची समोरासमोर भेट झाली, तेव्हा डॉक्टर कोल्हे यांनी त्यांना पायाशी वाकून नमस्कार केला. याचीही चर्चा गेल्या काही दिवसांपासून होतच आहे, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या कडवट टिकेला शालीन शब्दांमध्ये डॉ. अमोल कोल्हे उत्तर देतात, त्यामुळे त्यांचा हा राजकीय सुसंस्कृतपणा मतदारांसाठी कौतुकाचा विषय ठरला आहे.











