शिरूर : महान्यूज लाईव्ह
अत्यंत सर्वसाधारण कुटुंब… त्यातही गावात उच्च शिक्षणाची सोय नाही, मात्र तरीही जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर तिने यशाला गवसणी घातली आहे. शिरसगाव काटा येथे गावातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवला आहे.
शिरसगाव काटा (ता.शिरूर) हे पूर्व भागातील छोटेसे गाव. गावात उच्च शिक्षणाची सोय नसल्याने अनेक विद्यार्थी सध्या बाहेरगावी शिक्षण घेत आहेत. तर गावातील मुलींची देखील शिक्षणासाठी मोठी परवड होत असते.
शिक्षणाची बिकट अवस्था असताना ऋतुजा अण्णासाहेब कदम हिने नुकतेच बीएएमएस ही पदवी मिळवली असून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. ऋतुजाचे प्राथमिक शिक्षण शिरूर शहरात लोकसेवा विद्यालय तर दहावी पर्यंतचे शिक्षण विद्याधाम प्रशाला येथे झाले.
लहानपणापासून अभ्यासात हुशार असल्याने नवोदय विद्यालय येथे ११ व १२ वी चे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आयुर्वेद महाविद्यालय संगमनेर येथे प्रवेश घेतला. नुकतेच वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. सायबेज कडून या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात आल्याचेही तिने आवर्जून नमूद केले.
या यशाबद्दल बोलताना ऋतुजा यांनी सांगितले की, लहानपणापासून डॉक्टर व्हायचे हेच स्वप्न होते. स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडील अण्णासाहेब व आई मनीषा यांनी पाठबळ दिले. आर्थिक भार मोठा असतानाही कष्टाने हे यश मिळवले असून कुटुंबाचा मोठा यशात वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. शिरसगाव काटा या गावात प्रथमच ऋतुजा डॉक्टर झाली असून गावातील पहिली मुलगी डॉक्टर झाल्याने ग्रामस्थांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.











