इंदापुरात कोपरा सभेदरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्याची चर्चा
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : अगोदरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून धमक्या येत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे शरद पवार आमदार रोहित पवार देखील करत आहेत अशातच आता मोहोळच्या आमदार यशवंत माने यांच्या एका भाषणाने वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या इंदापूर तालुक्यातील भर कोपरा सभेत दोन दिवसांपूर्वी धनगर समाजाचे युवा नेते शशिकांत तरंगे यांना घरातून उचलून नेऊन त्यांना राज्यस्तरीय पद दिलं असे सांगितले. विरोधकांनी हाच मुद्दा धरुन राष्ट्रवादी च्या नेत्यांची दादागिरी सुरू आहे, हे जे आम्ही म्हणतो, त्याचा हा पुरावा असल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शशिकांत तरंगे यांची राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष पदी निवड केल्याचे पत्र देण्यात आले होते. इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथील रहिवासी असलेले शशिकांत तरंगे हे धनगर समाजाचा युवा व आक्रमक चेहरा आहेत. धनगर ऐक्य परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरात धनगर बांधवांचे चांगले संघटन उभे केले आहे. त्यांना नुकतेच हे पद देण्यात आले आहे.
मात्र आमदार मानेंच्या जाहीर सभेतील वक्तव्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी तालुक्यात इतरांवर दबाव टाकतात हा आरोप पुराव्यानिशी सिद्ध झाल्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते सांगू लागले आहेत. कारण शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून धमक्या आणि दमदाटी करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून केला गेला होता. आता या भर कोपरा सभेतील आमदार मानेंच्या वादग्रस्त विधानावर अजित पवार काय भूमिका घेतात? तसेच ते मानेंची कानउघाडणी करणार का? याकडे इंदापुरकरांचे लक्ष लागून राहिले आहे.











