राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाला दौंड मध्ये पुन्हा मोठा धक्का दिला. भाजपचे माजी पुणे जिल्हाध्यक्ष आणि भीमा पाटस कारखान्याचे माजी संचालक नामदेव ताकवणे हे शरद पवार यांच्या पक्षात येत्या 15 एप्रिल रोजी प्रवेश करणार आहेत.
त्यामुळे ताकवणे यांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवेशामुळे दौंडसह पुणे जिल्ह्यात भाजपला खिंडार पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणूक प्रक्रिया जसजशी जवळ येत आहे. तसतशी बारामती मतदारसंघात सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांना राजकीय धक्कातंत्र देण्याचे प्रकार घडत आहेत.
इंदापूर तालुक्यात सोनाई दूध संघाचे संचालक आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत सुनेत्रा पवार यांचा प्रचार करून त्यांना भरघोस मतांनी विजयी करणार असल्याची घोषणा केली होती.
मात्र आता शरद पवार यांनी दौंड तालुक्यात भाजपला एकामागून एक दे धक्का दिला आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी दौंड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची भेट घेऊन बंद दरवाजा आड चर्चा केली होती. ही घटना ताजी असतानाच शरद पवार यांनी पुन्हा भाजपला एक जोरदार धक्का दिला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांचे जवळचे निकटवर्तीय समजले जाणारे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक नामदेव ताकवणे हे आपल्या कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
नामदेव ताकवणे यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. येत्या 15 एप्रिल रोजी त्यांचा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश होणार आहे. त्यामुळे दौंड तालुक्यात भाजपला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. नामदेव ताकवणे हे मागील अनेक वर्षापासून दौंड भाजपचे आमदार आणि भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांच्या विरोधात भीमा पाटस कारखाना बचाव संदर्भात न्यायालयीन लढाई लढत आहेत.
भीमा पाटस कारखान्यात आमदार कुल यांनी कोट्यावधी रुपयांचा कथित भ्रष्टाचार केला असून भीमा पाटस कारखाना हा खाजगीकरण केला असा आरोप त्यांनी कुल यांच्यावर सातत्याने जाहीररित्या केला आहे. या संदर्भात त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांच्याकडे ही सातत्याने पुराव्यासहित तक्रारी केल्या होत्या. तसेच या संदर्भात ताकवणे यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन चर्चा केल्याने खासदार राऊत यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर ईडीने कारवाई करावी यासाठी तक्रारही दाखल केली आहे.
दरम्यान, याबाबत नामदेव ताकवणे म्हणाले की, मी अनेक वर्षापासून भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम केले. भीमा पाटस कारखाना बचाव या समितीखाली मी भीमा पाटस कारखानाच्या कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात सातत्याने लढत आहे. शेतकरी सभासद आणि कामगारांचा हक्काचा असलेला कारखाना वाचवावा त्यासाठी न्यायालयीन लढाई लढत आहे. भीमा पाटस कारखान्याच्या संदर्भात संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन शरद पवार यांनी मला दिल्याने मी येत्या 15 एप्रिल रोजी शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे.











