नाशिक : महान्यूज लाईव्ह
इलेक्शन लढणं म्हणजे काय सोपं काम नसतं, कोणालाही उमेदवारी जाहीर होऊ द्यात, पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतोय. परंतु या अलीकडच्या काळात पैशावर चालणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या काळातही अशा काही निवडणूका लक्षात राहतात किंवा असे काही उमेदवार चर्चेत येतात, जे लोकांच्या पाठबळावरती बरेच काही घडवून आणतात. सध्या लोकसभेच्या निवडणुकीतही असेच घडले आहे. पिंपळगाव बसवंत मधील भास्कर भगरेंना दिंडोरीच्या लोकसभेसाठी शरद पवारांनी उमेदवारी काय दिली; लोकांनी गावातच वर्गणी गोळा केली. वर्गणी गोळा करत आतापर्यंत दहा लाखाहून अधिक रक्कम जमा झाल्याचे सांगितले जात आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार यांच्या विरोधात शरद पवारांनी महाविकास आघाडीकडून भास्कर भगरेंना उमेदवारी जाहीर केली आहे. भास्कर भगरे हे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांचे घरही साधं आहे आणि साधा माणूस म्हणून ते या परिसरात परिचित आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पिंपळगाव बसमत येथील कन्या प्रशाळेत शिक्षक असलेल्या भगरे गुरुजींना उमेदवारी जाहीर होताच त्यांचा आईचे आशीर्वाद घेतानाचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
यामध्ये त्यांचे घरही दिसत आहे, त्यामुळे साधा माणूस आणि साधं घर अशी त्यांची सोशल मीडियातील टॅगलाईन झाली आहे. उमेदवारी जाहीर होताच वणी येथे महाविकास आघाडीचा मेळावा झाला. या मेळाव्यात उपस्थित लोकांनी समोरचा उमेदवार पैशाने मजबूत असल्याने आम्ही वर्गणी देऊ असे सांगितले. मग काही वेळातच १००, २००, ५००, १ हजार असे करत दहा लाखांची वर्गणी गोळा झाली. सध्या याचीच चर्चा राज्यात रंगली आहे.











