दौंड, महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये तलाव, विहिरी आटल्याने पिण्याचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती आहे. गेली तीन महिन्यांपासून मी राज्य सरकारकडे पाण्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी करत आहे. मात्र हे ट्रिपल सरकार पाण्याच्या प्रश्नांवर अजिबात गंभीर नाही. असा आरोप बारामती लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केला.
दौंड तालुक्यातील पाटस येथे श्रमिक मुक्त दलाच्या वतीने सोमवारी (दि १) पुनर्वसन ग्रस्तांच्या विविध मागण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उपस्थित पत्रकारांशी बोलताना खासदार सुळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली.
त्या म्हणाल्या की, पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती ,इंदापूर व पुरंदर तालुक्यात पाण्याचे मोठे संकट आहे. पिण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. पाण्याच्या प्रश्नाबाबत राज्य सरकारचे कुठलेही नियोजन नाही. गेल्या तीन महिन्यापूर्वी राज्य सरकारला सांगितले होते, पाण्याचे योग्य नियोजन करावे, दुष्काळी जन्य परिस्थितीवर मार्ग काढला जात नाही, राज्य सरकारला नागरिकांना पाणी द्यायचे नाही असे दिसत आहे.
दौंड आणि इंदापूर मध्ये जलजीवन योजनेच्या कोट्यावधी रुपये खर्च केले. मात्र योजनेचा कुठलाही उपयोग नागरिकांना झाला नाही. या योजनेत भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी येत आहेत. राज्य सरकारने जलजीवन योजनेची श्वेतपत्रिका काढावी, मग दूध का दूध पानी का पानी हो जायेगा. अशी मागणी केली.
राज्यात दुष्काळ, आरक्षण, बेरोजगारी आणि महागाई या प्रश्नांवर सरकार असंवेदनशील आहे. असा आरोप सुळे यांनी केला. संपवण्याची भाषा योग्य नाही. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील बारामतीतील शरद पवार यांना संपवण्यासाठी मी बारामतीत आलोय. पण चंद्रकांत पाटील संपविण्याची भाषा करणे कितपत योग्य आहे? ही दडपशाही नाही. लोकशाही आहे, मात्र सरकार सध्या ईडी, सीबीआय आणि पोलीस प्रशासन या शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करीत आहे. या देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे असे मत सुळे यांनी बोलताना व्यक्त केले.











