पुणे : महान्यूज लाईव्ह
अगोदरच कुरकुंभपासून पुण्यापर्यंत मेफेड्रीन ड्रग्स बनवण्याचे उद्योग पोलिसांनी उजेडात आणले असताना, काल पोलिसांनी केलेली कारवाई संपूर्ण राज्यात धक्का देणारी ठरली आहे. पुण्यातील मुंढव्यातील फक्त ७ वीपर्यंत शिक्षण झालेल्या एका गुन्हेगाराने थेट संगमनेर तालुक्यात वेल्हाळ गावात केमिकल ताडी बनवण्यासाठी लागणाऱ्या कोरल हायड्रेटचा चक्क कारखानाच टाकला होता. पोलीसही हे सगळे चित्र बघून चक्रावले आहेत.
पुणे शहरात केमिकल ताडीचा पुरवठा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने पुणे पोलीस सावध झाले होते त्यांनी यामध्ये तपास केला आणि मुंढव्यातील प्रल्हाद रंगनाथ भंडारी, (वय ६१ वर्षे, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विषारी रासायनिक बनावट ताडी तयार करण्याचा क्लोरल हायड्रेडचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
ही माहिती मिळाल्यानंतर भंडारी याच्याकडून पुणे शाखेने तब्बल पाच पोती क्लोरेल हायड्रेड जप्त केले. जवळपास दोन लाख 95 हजार 500 रुपयांचा हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्यानंतर हे क्लोरोल हायड्रेट कुठून येते याची चौकशी पोलिसांनी केली आणि पोलीसही चक्रावून गेले. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वेल्हाळ गावात या भंडारीने चक्क क्लोरोल हायड्रेड बनवण्याचा कारखानाच उभारला होता.
मग गुन्हे शाखेने संगमनेर तालुक्यातील वेल्हाळ गाव गाठले आणि येथील कारखाना उध्वस्त केला. त्यावेळी तिथून तब्बल अडीच टन क्लोरेल हायड्रेड ची पावडर पोलिसांनी जप्त केली. या पावडरची किंमत बाजारात 60 लाख रुपयांच्या आसपास आहे. फक्त सातवी पास झालेल्या भंडारी याने उभारलेला हा आयडॉलॉजिकल कारखाना गुन्ह्यांची हाताळणी करणाऱ्या पोलिसांनाही चक्रावणारा ठरला आहे.
दरम्यान या संदर्भात मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंढवा पोलीस पुढील तपास करत आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त प्रवीण पवार, अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, सुनिल तांबे, पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या पथकाने केली.











