दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
सातारा पुणे लेनवर धावत्या टँकरच्या डाव्या बाजूचे सहा टायर अचानक पेटले. त्यानंतर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक रमेश गर्जे यांनी यासंदर्भात माहिती दिली. शनिवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास सुरूर (ता वाई) गावच्या हद्दीतील सातारा पुणे महामार्गावर एका टॅकरला आग लागल्याची माहिती मिळाली. टँकरचे सहा टायर पेटल्याने महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती.
रमेश गर्जे, फौजदार विशाल भंडारे, विजय अवघडे, व भुईंज पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळावर पोचले. टॅंकरचा स्फोट होऊन काही अनुचित घटना घडू नये याची खबरदारी घेत सातारा पुणे व पुणे सातारा या महामार्गावरील येणारी व जाणारी वाहने थांबवून ठेवली.
सलग ३ दिवस लागोपाठ शासकीय सुट्या असल्याने व रविवारी होळीचा सण असल्याने पुणे मुंबईचे चाकरमानी आपआपल्या गावाकडे जात असल्याने महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी दिसत होती. टॅंकरला आग लागताच टॅंकरचालक पळून गेल्याने या टॅंकरमध्ये नक्की काय भरले आहे याची माहीती पोलिसांना मिळत नव्हती.
आग विझवायला वाई नगरपरिषदेची अग्नीशामक यंत्रणा वेळेत सुरुर गावात दाखल झाल्याने ही आग आटोक्यात आली व त्यामुळे पुढील अनर्थ टळण्यास मोठी मदत झाली. सुरुर ग्रामस्थांसह भुईंज पोलिसांनी या अग्नीशामक कर्मचाऱ्यांचे आभार मानले.











