बारामती : महान्यूज लाईव्ह
वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोरगाव-निरा रस्त्यावर रांजणगाव एमआयडीसीतून सिगारेटचा माल घेऊन निघालेला ट्रक दरोडा टाकून तब्बल साडेचार कोटींचा माल लुटणाऱ्या टोळीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
२४ जून २०२० रोजी दुपारी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रांजणगाव एमआयडीसीतून ४ कोटी ६१ लाख रुपये किमतीचा सिगारेटचा माल घेऊन हुबळीकडे निघालेला आयशर ट्रक दरोडा टाकून लुटण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकासह वडगाव निंबाळकर पोलिसांनी संबंधित आरोपींना जेरबंद करत त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला होता.
या प्रकरणी पोलिसांनी कल्याणसिंग सदुलसिंग चौहान (वय ४४, रा. ओढ, ता. सोनकच, जि. देवास), ओमप्रकाश कृष्णा झाला (वय ३८, रा. भैरवखेडी, ता. टोकखुर्द, जि. देवास), दिनेश वासुदेव झाला (वय ५०, रा. टोककला, ता. टोकखुर्द, जि. देवास), सुशील राजेंद्र झाला (वय ३७, रा. टोककला, ता. टोकखुर्द, जि. देवास), मनोज उर्फ गंगाराम राजाराम सिसोदिया (वय ४२, रा. भैरवखेडी, ता. टोकखुर्द, जि. देवास), सतीश आंतरसिंह झांझा (वय ४०, रा. ओढ, ता. टोकखुर्द, जि. देवास), मनोज केसरसिंग गुडेन (वय ४०, रा. ओढ, ता. टोकखुर्द, जि. देवास) या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ३ कोटी ८९ लाख रुपये किमतीची सिगारेट, दोन ट्रक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
अधिक तपास केला असता या आरोपींवर महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, कर्नाटक, ओरीसा, हरियाणा येथेही दरोडा टाकून माल लुटल्याप्रकरणी गुन्हे दाखल असल्याची बाब समोर आली. त्यामुळे या आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांच्याकडे पाठवण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर झाला असून अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर करीत आहेत. आतापर्यंत बारामती उपविभागात १६ टोळ्यांविरोधात आणि १२२ आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, तत्कालीन पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर आणि स्थाय गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे, पोलिस उपनिरीक्षक गणेश कवीतके, पोलिस नाईक विठ्ठल कदम, भाऊसाहेब मारकड, अमोल भुजबळ यांनी ही कारवाई केली होती. त्याबद्दल प्रभारी पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी या पथकाला १५ हजारांचे बक्षीसही जाहीर केले आहे.










