नगर : महान्यूज लाईव्ह
नगर जिल्ह्यातील या घटनेने नगरसह राज्य हादरले असून एका ९ वर्षीय अल्पवयीन मुलीवर महिनाभर दोघांनी सामूहिक बलात्कार केला, याचे चित्रीकरणही केले, मग हे चित्रीकरण नातेवाईकांनी पाहिल्यानंतर अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी संतोष रामभाऊ पवार व युवराज नंदू शेंडगे या दोघांविरोधात पोक्सो, अॅट्रॉसिटीसह सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. याबाबतची माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात या अल्पवयीन मुलीसोबत तब्बल एक महिनाभर वारंवार जबरी संभोग हे दोघे करीत होते. बलात्कार करताना त्याचे व्हिडीओ चित्रीकरणही करीत होते.
हे चित्रीकरण मुलीच्या नातेवाईकांच्या पाहण्यात आले आणि सर्व प्रकार उघड झाला. यासंदर्भात मुलीच्या नातेवाईकांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी दोघांकडे चौकशी केली, सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या खाक्या दाखवताच दोघांनीही या घटनेची कबुली दिली. न्यायालयाने या दोघांना १४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.











