दौंड, महान्यज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील भिगवण हद्दीत एका शेतकऱ्याला अफूची शेती आढळून आल्यानंतर आता दौंड तालुक्यातील डाळींब या गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात बेकायदा अफूची शेती आढळून आली आहे. यवत पोलीसांनी छापा टाकून बेकायदा अफूची लागवड करणा-याला अटक केली आहे.
ही माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली. अनिल बबन म्हस्के (वय ४२ वर्ष रा. उरूळीकांचन, पांडरस्थळ ता. हवेली जि.पुणे) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, हवेली आणि दौंड तालुक्याच्या शिवेवर असलेल्या दौंड तालुक्याच्या हद्दीतील डाळींब गावातील जमीन गट १७४ मधील शेतामध्ये बेकायदेशीर अफुच्या झाडांची लागवड केल्याची माहिती यवत पोलीसांना मिळाली होती.
त्यानुसार यवत पोलीसांनी शनिवारी ( दि.९ ) छापा टाकला असता, शेतात बेकायदेशीर अफुच्या झाडांची लागवड केल्याचे निदर्शनास आले. अनिल म्हस्के याने आठ गुंठे पुदीनाच्या क्षेत्रामध्ये काही अंतरावरील ६ सरींमध्ये सुमारे ११९ किलो १८४ ग्रॅम वजनाची अफुची हिरवट रंगाची बोंडे व पाने असलेली झाडे असल्याचे निदर्शनास आले.
त्याची एकूण किंमत अंदाजे २ लाख ३८ हजार ३६८ रुपये आहे. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून अनिल म्हस्के याला ताब्यात घेतले. त्याच्या विरूद्ध यवत पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनीयम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके करीत आहेत.
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके, पोलीस अक्षय यादव, निलेश कदम, महेंद्र चांदणे, राम जगताप, पोलीस शिपाई मारूती बाराते आदींनी ही कारवाई केली.











