पुणे : महान्यूज लाईव्ह
घटना पिंपरी चिंचवडमधील आहे. गॅस सिलिंडर लिकेज झाल्यानंतर लक्षात आले नाही, गॅस घरभर पसरला.. रात्री झोपताना मच्छर अगरबत्ती लावण्याच्या प्रयत्नात काडीपेटी पेटवताच घरभर पसरलेल्या गॅसने पेट घेतला. आगीचा भडाका एका क्षणात एवढा झाला की, दोन लहान मुलांसह पाच जण या घटनेत गंभीररित्या होरपळले.
चिंचवडमधील विद्यानगर येथील शंकर चव्हाण यांच्या घरी ही घटना घडली. या घटनेत चव्हाण यांच्या कुटुंबातील पाच जण गंभीररित्या भाजले असून त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
काल रात्री चिंचवड गावात ही घटना घडली. विद्यानगर येथील चव्हाण यांच्या घरातील गॅस सिलिंडरला गळती लागली होती. मात्र ही बाब चव्हाण यांच्या कुटुंबातील कोणाच्याच लक्षात आले नाही. रात्री झोपण्यापूर्वी डासांची अगरबत्ती लावण्यासाठी काडी पेटवली आणि घरात पसरलेल्या गॅसने साऱ्या घराला वेढा दिला.
आग भडकली आणि क्षणात आग भडकल्याने चव्हाण यांच्यासह कुटुंबातील त्यांच्या पत्नी अश्विनी, आई सुशीला व एक मुलगा व ४ वर्षीय मुलीला घराबाहेर पडायला वेळच मिळाला नाही. या आगीत ते पाचही होरपळले. त्यांना तातडीने उपचारासाठी ससूनमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.











