नेहा किल्लेदार, मानसशास्त्रज्ञ, पुणे
संगिता वय वर्ष ५०, माझा लेख वाचून माझ्याकडे आल्या. समोर बसल्या, तेव्हा खूपच संभ्रमावस्थेत होत्या. हे असं कौन्सिलर वगैरेकडे येणं त्यांना अवघड जातंय हे माझ्या लक्षात आलं… त्यांना पाणी दिलं आणि माझी माहिती आणि कौन्सिलिंगची प्रोसिजर सांगितली..
पुढची ५ मिनिटे परत शांततेत गेली, खूप वेळ मध्ये गेला आहे असं वाटून त्याच म्हणाल्या, खूप वेळ घेतेय का तुमचा? सॉरी हं, पण कळतच नाहीये काय सांगू, त्यांना म्हणलं, हवं ते सांगा. इथे तुम्हाला जज करणारं कोणीच नाहीये. इथे फक्त आपण दोघी आहोत. त्यामुळे तुम्ही किंवा मी याबद्दल जोपर्यंत बाहेर बोलत नाही, तोपर्यंत कोणालाच कळणार नाही. तुम्ही सांगायचा प्रश्नच नाही आणि मी तर तशी हमी दिली आहे तुम्हाला, तेव्हा काळजी न करता अगदी सुरुवातीपासून सांगा…
आता त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण थोडा हलका वाटला, आणि त्यांनी बोलायला सुरवात केली… अगदी मुलांच्या लहानपणापासूनच त्यांची आजारपणं, शिक्षण, अभ्यास, खाणं पिणं, आवडी निवडी, सगळं सगळं अगदी कसोशीने पाळलं आणि कोणी जबरदस्ती केली म्हणून नाही, मला वाटलं त्यांना माझी गरज आहे, त्यांच्या डोळ्यात दिसायचं ते आणि मी करायची.
बऱ्याचदा त्यांच्याकरता मी माझे प्लॅन्स बदलले, मैत्रिणी, नातेवाईक, अगदी नवऱ्यालासुद्धा मागे ठेऊन यांच्यासाठी, यांच्याबरोबर उभी राहिले….
पण आता या सगळ्याचं ओझं होतंय हो. काकू कळकळीने म्हणाल्या, नाही जमत, आता या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं, वयानुसार होत नाही, एका वयानंतर सुटी होतील वाटलं होतं, मग जगू आपण आपलं आयुष्य… पण इथे तर रोज नव्याने अडकतीये… बर याला अडकणे म्हणावं तरी ते पटत नाही…
तुम्हाला माहित असेलच साधारण १०, १२ च्या मुलांच्या पालकांना, समुपदेशक, शिक्षक, नेहमी सांगत असतात की, तुमच्या अपेक्षा त्यांच्यावर लादू नका, त्यांचा कल बघा. त्यांना समजून घ्या. त्यांच्या कलाने घ्या… तुमच्या अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर टाकू नका. मुलांवर आईने अपेक्षा लादू नयेत, पण म्हणून मुलांनी पण आईवर त्यांच्या अपेक्षा लादणे योग्य आहे का?
आई मुलांच्या मनाप्रमाणे वागत आली, म्हणजे तिला तिचं मन नाहीये का? ती स्वतःचा विचार करू शकत नाही का? आताशा कंटाळा येतो या एकटेपणाचा. मुलं नातेवाईक आहेतच, पण एक आपली जागा हवी असं वाटतं, हक्काचं कोणीतरी… सोबत हवी अशाच वयात नेमका नवरा सोडून गेला… तो असल्यामुळे कुठल्या मित्र मैत्रिणीची कधी गरजच नाही भासली… वाट्टेल ते त्याच्याशी बोलायचे, अगदी त्याच्या आई वडिलांबद्दल सुद्धा… पण तो गेला तशी ती जागाच हरवून बसले मी…
एक मित्र मैत्रीण आहेत माझे, त्यांच्या बरोबर मी फिरायला जाते, योगाला जाते, आम्ही ट्रीप्स प्लॅन करतो, मी छान आनंदी असते, पण बहुतेक याचाच मुलाला त्रास होतोय की, ही आम्हाला सोडून एवढी मजा कशी करतेय. आम्ही इथे खपतोय दिवसभर, आम्हाला सुट्टी मिळत नाही आणि ही मात्र फिरतीये. हिने घराकडे लक्ष द्यायला हवं, पण मॅडम मी हे सगळं सांभाळून करते हो…
त्यांचं सगळं बोलणं ऐकून घेतलं. त्यांना यातून बाहेर पडण्यासाठी काय करता येईल हे सांगितलं आणि त्या गेल्या. पण माझ्या डोक्यातून त्या जे काही बोलल्या ते काही केल्या जात नव्हतं. सारखं सारखं एकच वाक्य घोळत होतं, मुलांवर आईने अपेक्षा लादू नयेत, पण म्हणून मुलांनी आईवर त्यांच्या अपेक्षा लादणे योग्य आहे का?
किती सहज आपण आईला सांगतो, आज शनिवार आहे, मी सकाळी चहा करणार नाही, मी रोज करते… मी रोज दिवसभर ऑफिसलाच असते, आज आराम करणार आहे, तू आहेस ना घरीच, पार्सल येईल. तुला आत्ताच का मैत्रिणीकडे जायचंय? घरीच असता ना दोघी, मग नंतर जा उद्या वगैरे, तू आहेस म्हणुन आम्ही दोघं बाहेर जायचं म्हणत होतो. पण आता जातेच आहेस मैत्रिणीकडे, तर कॅन्सल करतो. खरं तर एकच दिवस सुट्टी असते, पण ठीक आहे…
खरंच एखाद्या माणसाने आपल्याला असं गृहीत धरलं तर चालेल का? आपल्याशी कोणी असं वागलेलं आपल्याला चालेल का? साधं बॉसने एखादं काम जास्त दिलं तर आपली चिडचिड होते की, अशी कशी न विचारता कामं लादतात आणि इथे आपण नुसती अपेक्षा करत नाही आपण गृहीत धरतो.
तेवढ्यावर थांबत नाही आपण, तिने एखाद्या गोष्टीला नाही म्हणलंच कधी, तर त्यावरून तिला गिल्ट देतो आणि वर्षानुवर्ष चालत आलेल्या या गोष्टीत आपल्याला वावगं काहीच वाटत नाही… बऱ्याचदा तिची घुसमट होते, कधी नवरा आणि सासू सासरे, कधी नवरा आणि मुलं… सगळ्या घरामध्ये समतोल साधण्यात आपण तिचं आयुष्य जातं आणि आपण कौतुक तर लांबच पण साधं कंन्सिडरही करत नाही..
बऱ्याचदा आपल्याला हे कळतच नाही, तर कधी कळत असूनही आपल्याला काही करता येत नाही, आपण मुद्दाम वागतो असं नाही पण आपल्या कामाच्या व्यापात या गोष्टी बघायच्या राहून जातात… अशा वेळी काय करायचं? आपल्याला वाटतंय म्हणून आईला यात आनंद मिळेल हा विचार करण्यापेक्षा आईला नक्की काय केल्यानं आनंद मिळतोय हा विचार करण्याचा प्रयत्न करा.. त्या संधी तिला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करा..
थोडीशी मोकळीक द्यायचा प्रयत्न करा…. तिला एखादी नवीन गोष्ट /टेक्नॉलॉजी इंन्ट्रोड्यूस करा/ शिकवा… आपल्या लहानपणापासूनच आई आपल्या प्रत्येक गरजेला होती… आता आपण तिला तिचं आयुष्य जगायची मुभा देऊया… आणि यावर्षीच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक वेगळा प्रयत्न करूया. आनंदी राहूया आणि आनंद देऊया….
नेहा किल्लेदार, मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक (९९२३०४२०१,९४०५२६२०६६)











