पुणे – महान्यूज लाईव्ह
लोणावळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दमबाजी केली अशी माहिती दिल्यानंतर शरद पवार संतापले. त्यांनी पहिल्यांदाच एखाद्या आमदाराला वाकड्या मार्गाचा इशारा दिला आहे. त्यामुळे याची जोरदार चर्चा सुरू आहे.
या मेळाव्यात सुनील शेळके यांना उद्देशून पवार म्हणाले, तु कोणामुळे आमदार झाला? फॉर्म आणि चिन्हासाठी जी सही लागते, ती माझी सही होती. तू कोणाच्या जिवावर आमदार झाला? सुनील शेळके पुन्हा असं काही केलं, तर लक्षात ठेवा, मला शरद पवार म्हणतात. एकतर मी या रस्त्याने कधी जात नाही, पण अशा रस्त्याने जाण्याची जर स्थितीच निर्माण केली, तर मी सोडणार नाही.
दरम्यान या मेळाव्यानंतर लागलीच आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परीषद घेतली. ते म्हणाले, शरद पवार यांनी शहानिशा न करता माझ्यावर आरोप केले आहेत. मी पवारसाहेबांना जाऊन भेटणार आहे. माझी काय चूक झाली हे सांगावे, मी आठ दिवसांत कोणाला फोन केला, दादागिरी केली किंवा फोन केला की, साहेब मावळ तालुक्यात येताहेत, आपण जाऊ नका असा एकतरी व्यक्ती उभा करावा. नाहीतर मी मावळ तालुक्यात येऊन साहेबांनी खोटे आरोप केले असे मी राज्यात जाऊन सांगेन.











