नवी दिल्ली – महान्यूज लाईव्ह
पक्षाने पवन खंडेलवाल यांना तिकीट जाहीर केले आणि चांदणी चौक येथून तिकिट नाकारल्यानंतर आता माजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राजकीय संन्यास जाहीर केला. त्यांच्या या पावित्र्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
दुसरीकडे पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर काही वेळातच पवनसिंह यांनी भाजपची उमेदवारी नाकारली. त्यांच्या या पावित्र्यानेही भाजपमधील नेते हैराण झाले आहेत. दोन भाजप नेत्यांनी घेतलेल्या या राजकीय पवित्र्याची देशभरात चर्चा होत आहे.
केंद्रीय मंत्री असतानाच डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोनाच्या काळात आरोग्य मंत्रालय सांभाळले. मात्र त्यानंतर त्यांच्याकडून आरोग्य खाते काढून घेण्यात आले होते. सलग पाच वेळा विधानसभा निवडणूका जिंकल्या. सन २०१४ नंतर ते २०१९ मध्येही ते चांदणी चौक येथून लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते.
भोजपुरी कलाकार असलेले पवनसिंह यांनी आसनसोल मतदारसंघातून आपण निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्या तरी कारणामुळे आपण ही निवडणूक लढविणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशातील लोकसभा निवडणूकीसाठी भाजपकडून तिकीट मिळविण्यासाठी एवढी रस्सीखेच सुरू असतानाच एका उमेदवाराने तिकीट नाकारावे याकडे सर्वांनी लक्ष वेधले आहे.
दरम्यान पवनसिंह यांना उत्तर प्रदेशातून तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना पश्चिम बंगालमधून त्यांना उमेदवारी मिळाली, तिकडे पश्चिम बंगालमध्ये निवडणूक अडचणीची ठरेल म्हणून तिकीट नाकारले असावे असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.











