घनश्याम केळकर : महान्यूज लाईव्ह
बारामती : बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव हे शरद पवार गटात असल्याचे आता स्पष्ट झाले असून. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या प्रचार प्रमुखपदी त्यांची निवड झाल्याची माहिती खुद्द शरद पवार यांनी दिली.
शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत बारामती तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष अॅड. एस. एन. जगताप, माजी नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर, वीर सावरकर स्वीमर्स क्लबचे डॉ. अशोक तांबे, युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे, शहराध्यक्ष संदीप गुजर यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
सदाशिव सातव यांच्या निवडीने बारामतीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. सदाशिव सातव यांच्या वडिलांपासून सातव कुटुंब हे बारामतीच्या राजकारणातील महत्वाचे स्थान टिकवून आहे. सदाशिव सातव यांच्या वडिलांनी शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी साथ दिली होती.
तेव्हापासून सातव कुटुंबिय शरद पवार आणि पवार कुटुंबासोबत राहिलेले आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर ताबा मिळविल्यानंतर सातव कुटुंब अजित पवार यांच्यासोबत गेल्याचे दिसत होते. सदाशिव सातव यांचे चिरंजीव सचिन सातव हे बारामती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आहेत. ही बॅंक अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आहे.
सदाशिव सातव यांचे दुसरे चिरंजीव नितीन सातव हे माळेगाव सहकारी बॅंकेचे संचालक आहेत. या कारखान्याचे चेअरमन व संचालक अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. या स्थितीत सदाशिव सातव यांचे उघडपणे शरद पवारांच्या पक्षाकडून पद स्विकारणे हा मोठा धक्का आहे. त्यामुळे सदाशिव सातव यांच्या प्रचारप्रमुख पदाची जास्त चर्चा झाली.
बारामतीचे माजी नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे हे शरद पवारांचे जुने सहकारी आहेत. त्यांनीही शरद पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. जवाहर वाघोलीकर बारामती शहरात तर सतीश खोमणे हे तालुक्यात प्रचार, प्रसार आणि संपर्क यंत्रणा राबविण्याचे काम करणार आहेत. या राजकीय घडामोडींनी बारामती लोकसभेची निवडणूक अधिकच रंगतदार बनत चालली आहे.











