दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : हिलदारी अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांची माहिती, रेशन कीट व शैक्षणिक साहित्याच्वाया वितथणाने वाईच्या प्रांताधिकारी कार्यालयात नुकताच आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिन साजरा करण्यात आला
१ मार्च १९९२ रोजी युनिव्हर्सिडॅड लिब्रे डी बॅरनक्विला (बॅरनक्विला विद्यापीठ) येथे ११ कामगारांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून कचरा वेचक आणि या व्यवसायाशी निगडित इतर कामगारांनी आपल्या कामाला मान्यता मिळावी यासाठी लढा सुरु केला. तेंव्हापासून १ मार्च रोजी जगभरात आंतराष्ट्रीय कचरा वेचक दिन साजरा केला जातो.
भारतामध्ये ४ कोटींहून अधिक कचरा वेचक आहेत, जे दरवर्षी ५.३१ दशलक्ष टन कचऱ्यापैकी जवळपास २० टक्के कचऱ्याच्या पुनर्वापरात योगदान देतात. हे बिनपगारी आणि अनोळखी कर्मचारी अनेक शहरांना कचरामुक्त राहण्यास आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यास मदत करतात.
हिलदारी अभियानांतर्गत प्लान फाऊंडेशन व रिसिटी या घन कचरा व्यवस्थापनात काम करणाऱ्यांचे जीवनमान सुधारावे, समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलावा, समाजात त्यांना एक स्थान असावे, कचरा वेचण्याचे काम करताना आरोग्य व सुरक्षिततेची काळजी घ्यावी यासाठी विविध उपक्रम राबवते.
१ मार्च २०२४ रोजी जागतिक कचरा वेचक दिनानिमित्त कचरा वेचकांचे महत्त्व, भूमिका आणि संघर्ष अधोरेखित करून कौतुकाचे प्रतीक म्हणून प्रांत कार्यालय वाई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र जाधव व वाई च्या तहसीलदार सोनाली मेटकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिलदारीचे असिस्टंट मॅनेजर डॉ. मुकेश कुळकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते कचरा वेचकांना रेशन कीट चे वाटप करण्यात आले. सदर रेशन कीटसाठी महाबळेश्वर मधील हॉटेल गौतम, हॉटेल एम.पी.जी. क्लब, महाबळेश्वर प्रेमी ग्रुप व श्री प्रथमेश श्रीनिवास यादव यांचे सहकार्य लाभले.
या कचरा वेचक महिलांच्या शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना हिलदारी मार्फत स्कूल कीट चे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना श्री राजेंद्र जाधव यांनी उपस्थित कचरा वेचक महिलाना शासनाच्या उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती दिली व संबंधित अधिकाऱ्यांना समक्ष बोलावून या सर्व कचरा वेचक महिला व त्यांच्या परिवारातील सदस्यांचे आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, जातीचा दाखला, विधवा पेन्शन, संजय गांधी निराधार योजनां व इतर पात्र शासकीय योजनांसाठी प्राधान्याने नियोजन करण्याबाबत सांगितले.
त्याचबरोबर कचरा वेचकांनी सदर काम कष्टाने व प्रामाणिकपणे करण्याबाबत व कामादरम्यान चोरी व इतर प्रकार यापासून लांब राहण्याबाबत सूचित केले, अन्यथा संबंधित यंत्रणांमार्फत दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, याबाबत थोडक्यात समजावून सांगितले. यानिमित्ताने कचरा वेचक महिला व त्यांच्या संपूर्ण परिवाराचे ग्रामीण रुग्णालय, वाई यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. ज्यात कचरा वेचका महिला व त्यांच्या परिवाराने सहभाग घेतला.
कचरा वेचक महिला नीलम साळुंखे म्हणाल्या की, हिलदारी अभियानांतर्गत आमच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली यात ग्रामीण रुग्णालयामध्ये आमच्या व आमच्या परिवाराचे रक्त, डोळे, एक्स रे, त्वचा रोग व इतर तपासण्या करण्यात आल्या व सदरच्या तपासण्या किती व का महत्वाच्या आहे याबाबत आम्हाला सोप्या भाषेत समजवून सांगण्यात आले.
कचरा वेचक सुवर्णा नेसरेकर म्हणाल्या कि, आम्हाला आज रेशन कीट व आमच्या शाळेच्या मुला मुलींना शैक्षणिक साहित्य सुद्धा मिळाले. यामुळे आमच्यासोबतच आमच्या परिवाराचा विचार सुद्धा हिलदारी मार्फत करण्यात येतो याचा आम्हाला आनंद तर आहेच, पण समाजामध्ये एक दुर्लक्षित घटक म्हणून असलेल्या आम्हाला आज खऱ्या अर्थाने सन्मान मिळतो आहे.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी हिलदारी टीम चे राम भोसले, प्रतिमा बोडरे, फैयाज वारुणकर, खाकसारली पटेल, गौरी चव्हाण, अमृता जाधव, अनुराग खरे यांनी नियोजन केले.











